अमरावती – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी केल्यानंतर राज्यात वादंग निर्माण झाला. अनेक मुस्लीम संघटनांनी राज ठाकरेंच्या विधानाचा विरोध केला तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात दंगल घडवण्याच्या हेतूने भोंग्याचे राजकारण केले जात आहे असा आरोप मविआ नेते करत आहे. त्यामुळे राज्यात भोंग्यांचे राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे.
यातच राज्यमंत्री बच्चू कडू(Bacchu Kadu) यांनी भोंग्यांच्या राजकारणावर भाष्य करत मंदिर, मशिदीसह निवडणुकीतील राजकीय नेत्यांचेही भोंगे बंद करा अशी मागणी केली आहे. बच्चू कडू म्हणाले की, राजकीय नेत्यांचे निवडणूकीत भोंगेही बंद करा. दोन वर्षे कोरोनामुळे सर्व मंदिर,बौद्ध विहार,मशिदी मधील भोंगे बंद होते त्यावेळी फक्त रुग्णवाहिकेवरचा भोंगा सुरू होता. देशात सध्या काय परिस्थिती आहे. मूळ मुद्दे बाजूला सारून वेगळे मुद्दे मांडले जात आहे. भोंगे बंद करायचे असेल तर सर्वच भोंगे बंद केले पाहिजे. निवडणूकीत राजकीय लोकांचे भोंगे बंद करून भोंगा नावाचा शब्दच बंद करावा असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे.
संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला
उत्तर प्रदेशातील निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने एमआयएमच्या ओवेसींचा वापर केला. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात हिंदू समाजात काही औवेसी निर्माण करण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात फूट पाडण्याचे, दंगली घडविण्याचे आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयोग सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेते खा. संजय राऊत(Sanjay Raut) यांनी करत राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
राऊत म्हणाले की, नवहिंदू औवेसींच्या माध्यमातून भाजप हे काम करवून घेत आहे. मात्र, राऊत यांनी थेट राज ठाकरेंचं नाव घेण्याचे टाळले. हे मी कोणाचे व्यक्तिगत नाव घेऊन बोलत नाही. महाराष्ट्रातील औवेसींच्या माध्यमातून प्रयत्न आहेत परंतु महाराष्ट्राची जनता अत्यंत सावध आहे, जागरूक आहे, संयमी आहे आणि ज्ञानी आहे, एवढेच मी सांगेन. देशभरातील दंगलीचा व्यापक कट आहे आणि जे दिल्लीत घडले ते महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. परंतु यशस्वी होणार नाहीत, असंही राऊत म्हणाले.