उदगीर (जि. लातूर) : उदगीर येथे २२ ते २४ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राज्यमंत्री संजय बनसोडे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा संमेलनाचे संयोजक बसवराज पाटील-नागराळकर यांनी केली. या संमेलनाच्या प्रमुख मार्गदर्शकपदी पालकमंत्री अमित देशमुख राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
साहित्य संमेलन तयारी आढावा बैठक घेण्यात येऊन बोधचिन्हाचे प्रकाशन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष व संयोजक बसवराज पाटील-नागराळकर होते. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, संस्था सचिव मनोहर पटवारी, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, मनोहर पटवारी, सभापती शिवाजीराव मुळे, तहसीलदार रामेश्वर गोरे, रमेश अंबरखाने, दिनेश सास्तुरकर, संस्था उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, मुख्याधिकारी भारत राठोड, नाथराव बंडे, पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, चंद्रकांत पाटील-कौळखेडकर, मल्लिकार्जुन मानकरी, महादेव नौबदे, जितेंद्र शिंदे, उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक रामचंद्र तिरुके यांनी केले. या कार्यक्रमात साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह तयार केलेले बार्शी येथील कलाकार किरण कुलकर्णी व जयंता पवार यांचा राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्वागताध्यक्ष पदाचा सन्मान मला दिला गेल्याचा माझ्या जीवनातील मोठा आनंदाचा क्षण असल्याचे राज्यमंत्री बनसोडे म्हणाले. या साहित्य संमेलनाचे प्रमुख सल्लागार पालकमंत्री अमित देशमुख राहणार असल्याचे राज्यमंत्री बनसोडे यांनी जाहीर केले. सूत्रसंचालन प्रा. राम साबदे यांनी केले. आभार प्रा. हमीद अश्रफ यांनी मानले.