Ganesh Festival Konkan ( Marathi News ) :गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक कोकणात जातात, या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहतूक सुरुळीत राहण्यासाठी जड वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
रवींद्र चव्हाण म्हणाले की, "गणपतीसाठी मोठ्या संख्येने कोकणवासी आपल्या गावाकडे जातात, त्यामुळे या काळात या मार्गांवर वाहतुकीचे प्रमाण अधिक असते, हे लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने या ठिकाणी पर्यायी मार्गांचे काम करण्यात आले आहे, जेणेकरुन पर्यायी मार्गावरुन ही वाढीव वाहतूक सहजतेने ये-जा करु शकेल. तसेच या काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांसाठी गणेशोत्सवानिमित्त दि. १९ सप्टेंबर पर्यंत टोलमाफी करण्यात आली आहे," अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
मुंबई गोवा महामार्गाचे काम बीओटी तत्वावर असून या महामार्गावरील १४ ठिकाणी पुलांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यामुळे या ठिकाणी सर्व्हीस रोडचा वापर करण्यात अडचण येत असल्याने या ठिकाणी रहदारीची समस्या निर्माण होते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या महामार्गावरिल प्रलंबित कामे सुव्यवस्थितरित्या गतीने पूर्ण केली जावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वेळोवेळी पाहणी करुन त्याबाबत नियंत्रण ठेवल्या जात आहे. या ठिकाणी पुलाचे काम प्रलंबित असल्याने प्रामुख्याने अ़डचण होत असल्याचे सांगून मंत्री चव्हाण यांनी सुरळीतरित्या वाहतूक करणे शक्य होण्यासाठी कंत्राटदारांनी दर्जेदार काम करणे आवश्यक असल्याचं सांगितलं.
गणेशोत्सवानिमित्त गणपती आरती ॲपची निर्मिती
गणेशोत्सवात सर्वत्र भक्तीमय उल्हासाचे वातावरण असते, या निमित्ताने विविध आरती एकत्रितपणे उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने ॲप सुरु करण्यात येत असून ravindrchavan.com या युआरएलवर सर्व आरतीचे व्हिडिओ, ऑडिओ उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती ही चव्हाण यांनी यावेळी दिली.
दरम्यान, गणेशोत्सवात कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र गणपतीचे आगमन मोठ्या जल्लोषात केली जाते. यामध्ये दहा दिवस विविध आरती, भक्तीगीतांच्याद्वारे गणपतीचे पूजन करण्यात येते, यासाठी सहजतेने या आरती उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आरतीचे व्हिडिओ, ऑडिओंचे संकलन करुन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याचसोबत भविष्यात या माध्यमातून कोकणातील गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन पुस्तके उपलब्ध करुन देण्यासारखे सामाजिक उपक्रम राबवण्याचे नियोजन असल्याचंही रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे.