नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री -
महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तित्त्व, कर्तृत्व आणि नेतृत्व कधीही विसरू शकत नाही. बाळासाहेब एक स्टेट्समन होते. तसेच ते अतिशय विशाल हृदयी नेते होते. मुंबईमध्ये सुरुवातीच्या काळात मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यानंतर याच संघटनेच्या माध्यमातून हिंदुत्वाचा विचार संपूर्ण महाराष्ट्रात रुजवण्याचा, जागवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. टोकदार कुंचला, अणकुचीदार लेखणी आणि मुलुखमैदानी तोफ म्हणावे असे वक्तृत्व बाळासाहेबांना लाभले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना युतीचे सरकार महाराष्ट्रात आले. युतीच्या सरकारचे खरे शिल्पकार बाळासाहेब ठाकरे हेच होते. त्या काळात त्यांनी मराठी माणूस, मराठी संस्कृती यांना कसा वाव मिळेल, महाराष्ट्राचा विकास कसा होईल यासाठी मनापासून प्रयत्न केले. मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना ते अनेक विषयांवर मार्गदर्शन करीत. बाळासाहेबांनी शिवसैनिकांमध्ये जाज्वल्य देशाभिमान निर्माण केला. शिवाय, मराठी संस्कृती, मराठी इतिहासाबद्दलची कटिबद्धताही निर्माण केली. बाळासाहेबांचे आणि माझे व्यक्तिगत संबंध अतिशय जवळचे होते. माझ्या आयुष्यावर ज्यांचा फार मोठा प्रभाव पडला, त्यात बाळासाहेब आणि अटलजी ही दोन नावे आवर्जून घ्यावी लागतील. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारच्या काळात अनेक प्रकारचे ताण-तणाव निर्माण झाले. पण, बाळासाहेबांशी माझे व्यक्तिगत संबंध नेहमीच चांगले राहिले. आमच्यात अंतराय आला नाही. त्यांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, मुंबई शहरातील उड्डाणपूल, वरळी-बांद्रा सी-लिंक या सगळ्या प्रकल्पांच्या मागे बाळासाहेब उभे राहिले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेचे भूमिपूजन बाळासाहेबांच्या हस्ते झाले. पंचावन्न उड्डाणपुलांच्या कामाचे आणि सी- लिंकच्या कामाचे भूमिपूजनही त्यांनी केले. या सगळ्या कामांबद्दल त्यांना आस्था होती आणि अभिमान होता. त्यांचा ते सातत्याने गौरवाने उल्लेख करायचे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे ते नेहमी म्हणायचे आणि त्यासाठी मी व माझे सहकारी करीत असलेल्या धडपडीबद्दल आमचे कौतुक करायचे. सरकार गेल्यानंतर त्यांच्या जीवनावर एक पुस्तक काढण्याचा प्रस्ताव आला तेव्हा त्यात काही छायाचित्रे हवी होती. त्यांनी राज ठाकरेंना सांगितले की, `मला फ्लायओव्हरवर फोटो काढायचा आहे, पण मी एकटा नाही काढणार फोटो. नितीनला बोलाव...’… आणि माझ्यासोबत त्यांनी तो फोटो काढला. संपर्कात आलेल्या प्रत्येक माणसाचा, कार्यकर्त्याचा त्यांनी नेहमी सन्मान केला आणि प्रेम केले. आपल्या कार्यकर्त्यांबद्दल त्यांना अपार आपुलकी होती. संकटात असलेला कार्यकर्ता असो वा आंदोलनामुळे तुरुंगात असलेला, त्यांच्या प्रति त्यांच्या हृदयात एका बापाचे प्रेम होते. ते कार्यकर्त्यांची आणि कुटुंबीयांचीही काळजी घेत. बाळासाहेब फार संवेदनशील होते. आमच्या संवादादरम्यानची आणि इतर ठिकाणची त्यांची अनेक वाक्ये मला सुभाषितांसारखी आठवतात. सार्वजनिक ठिकाणचे एकीकडे धाडसी आणि दुसरीकडे हळवे असे वर्तनही आठवते. विशेषतः माँसाहेबांचे निधन झाल्यानंतरचा प्रसंग माझ्या मनःपटलावर कायम कोरला गेला आहे. बाळासाहेब दादर स्मशानभूमीच्या बाहेर आले आणि त्यांनी ट्रकवर चढून भोवतालच्या अफाट जनसमुदायाला खाली वाकून अभिवादन केले आणि आभार मानले. एवढ्या मोठ्या नेत्याचे हे हळवेपण, हे माणूसपण, जनतेप्रति एवढी आपुलकी ही माझ्यासाठी अपूर्वाई होती. प्रसंग कोणताही असो, बाळासाहेब एकदा उभे राहिले, की संपूर्ण वातावरणावर जणू गारूड व्हायचे. सभागृह असो वा जाहीरसभा, सगळे लोक रोमांचित व्हायचे. त्यांच्या खुसखुशीत आणि तेवढ्याच खरमरीत वक्तृत्वाने उभ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. खऱ्या अर्थाने त्यांनी जनमानसावर राज्य केले. त्याचबरोबर जनतेच्या मनात प्रेम निर्माण केले. ते `यारों के यार’ होते. ज्याच्याशी त्यांनी दोस्ती केली, ज्याच्यावर त्यांनी प्रेम केले, तो पक्षातला आहे की बाहेरचा याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. त्यामुळेच पक्षाबाहेरच्या लोकांशीसुद्धा त्यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा नेहमीच पूजनीय -व्यक्तिगत आयुष्यात मी बाळासाहेबांना कधीही विसरू शकत नाही. त्यांनी दिलेले प्रेम, त्यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी नेहमीच अमूल्य राहिले आणि राहणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. त्यांच्या सहवासामुळे, मार्गदर्शनामुळे आपण गौरवान्वित झालो आहोत, अशी भावना माझ्या मनात आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात कायमस्वरूपी आदर आणि श्रद्धा आहे. ज्या-ज्या नेत्यांनी मला शिकवले-घडवले, त्या लोकविलक्षण माणसांच्या नक्षत्रमालेत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा माझ्यासाठी नेहमीच पूजनीय असेल.