Sanjay Shirsat: ठाकरे गटाचे राजापूर-लांजाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. राजन साळवी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार वैभव नाईक हे दोनच शिलेदार ठाकरेंकडे राहिले आहेत. अशातच वैभव नाईक हेदेखील ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. यावर आता मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजन साळवी हे नाही म्हणता म्हणता शिवसेनेत आले असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
राजन साळवी यांनी ठाकरे गटाला रामराम केल्यानंतर आणखी नेते पक्ष सोडणार असल्याचे म्हटलं जात आहे.राजन साळवी, रत्नागिरीचे माजी आमदार सुभाष बने आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता वैभव नाईक हे देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत पत्रकरांनी विचारले असता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे.
"राजन साळवी सांगत होते की मी जाणार नाही. पण ते आले ना. वैभव नाईकही तेच सांगत आहेत. म्हणजे तुम्ही याचा अर्थ समजून घ्या हे जे काही येणारे आहेत ते सगळे नाही म्हणून येणारे आहेत. त्यामुळे भास्कर जाधव, वैभव नाईक यांच्यासह अनेक खासदार, आमदार हे केव्हा येणार आहेत याची तारीख तुम्हाला एकनाथ शिंदे सांगू शकतील. म्हणून वेट अँड वॉचची भूमिका घ्यायला पाहिजे," असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.