बेळगाव : सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव येथे गेलेले आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी त्यांना सीमेबाहेर सोडले. दरम्यान या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध केला आहे. भाषावार प्रांत रचनेची घोषणा झाल्यावर सीमाभाग कर्नाटकात डांबला गेल्यामुळे सीमाभागात संतापाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी १७ जानेवारी १९५६ यादिवशी झालेल्या आंदोलनात बेळगाव आणि निपाणी येथे पोलिसांच्या गोळीबारात पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते.
यामध्ये निपाणी येथील कमलाबाई मोहिते, बेळगाव येथील पैलवान मारुती बेन्नाळकर यांच्यासह अन्य तिघांचा समावेश होता. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्मा चौकात दरवर्षी या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते.हुतात्मा चौकात शुक्रवारीही सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे अभिवादन करण्यात आले. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर बेळगावात हुतात्मा चौकातील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. बंदी आदेश असल्यामुळे बेळगाव पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकारामुळे कर्नाटक पोलिसांची मुजोरी वाढल्याचे दिसून येते.बेळगावातील हुतात्मा चौकात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना यांच्यातर्फे हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पचक्र, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढली. यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त होता.
दरम्यान, हुतात्म्यांना हार घालण्याची सौजन्यपूर्ण केलेली विनंतीही कर्नाटक पोलिसांनी धुडकाऊन लावत बळाचा वापर करून त्ताब्यात घेतले.या घटनेचा सीमावासीयांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.