मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग प्रयत्न करीत आहे. परंतु, कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी म्हणजेच ‘मराठी राजभाषा दिनी’ मराठी भाषेला मिळणारा अभिजात भाषेचा दर्जा लांबणार असून सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांचा दावा फोल ठरला आहे.मराठी राजभाषा दिनापूर्वी म्हणजे २७ फेब्रुवारीपूर्वी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करुन देणार, असा दावा काही दिवसांपूर्वी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केला होता. शिवाय, याकरिता पत्र आणि ई-मेल्सद्वारे साहित्य अकादमीला कळवून लोकचळवळ उभारण्याची धडपडही तावडेंनी केली होती. त्यामुळे अवघे साहित्यविश्व आणि मराठीजनांचे डोळे मराठी राजभाषा दिनाकडे लागून राहिले होते. परंतु, आता या दाव्यावर पाणी फिरले असून अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे औचित्य हुकणार आहे.मराठी राजभाषा दिनालाच अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देऊ, अशी वातावरण निर्मिती सांस्कृतिक मंत्र्यांनी या दिनापूर्वी केली होती. अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी साहित्य अकादमी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला, असून काही इतर केंद्रीय विभागांची मंजूरी रखडल्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी काहीसा विलंब होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
मंत्री विनोद तावडेंचा दावा ठरला फोल !
By admin | Published: February 27, 2015 2:51 AM