हितेन नाईक,
पालघर- कुपोषण, बालमृत्यू चा पालघर जिल्ह्यावर मागील २४ वर्षा पासून गडद होऊ पहात असलेला डाग पुसून काढण्याच्या दृष्टीने शासन, प्रशासन उदासीन असल्याने निष्पाप बालकांचे एकावर एक जात असलेले बळी पाहता उद्विग्न झालेल्या राज्यपालाच्या आदेशा नंतर महिला बालकल्याण मंत्री, आरोग्य मंत्री,आदिवासी विकास मंत्र्यांचा सयुक्तिक दौरा उद्या जव्हार, मोखाडा,खोडाळा भागात होत आहे. या दाऱ्यातून कुपोषणाचा हा डाग पुसून टाकण्यासाठी काही ठोस घडणार कि नेहमी प्रमाणे हा दौरा आश्वासनाच्या खैरातीच्या वाटपाने संपुष्टात येणार या बाबत साशंकता व्यक्त होत आहे.कुपोषणावर मात करण्याच्या दृष्टीने सरकारमार्फत आवश्यक पावले उचलली असल्याचा दावा अलीकडेच महिला बाल विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केला असला तरी त्यांच्याच खात्याच्या अखत्यारीतीतील एकात्मिक बाल विकास प्रकल्पाअंतर्गत पालघर जिल्ह्यात कार्यरत १३ प्रकल्पापैकी १२ प्रकल्पाच्या बाल विकास प्रकल्पाधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असून जिल्ह्यातील २५७९ अंगणवाडी सेविकांपैकी ९१ पदे तर तितक्याच अंगणवाडी मदतनिसांपैकी १३५ पदे व मिनी अंगणवाडी सेविकांच्या ६०४ पैकी १११ पदे रिक्त असून या पदांच्या भरतीसाठी वारंवार पाठपुरावा करून आणि राज्य शासनाच्या कोअर कमिटीत निर्णय होवूनही पंकजा मुंडेंना त्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही. जिल्ह्यात ६०० बालकांचा कुपोषणामुळे वर्षभरात मृत्यू झाला व आजही असंख्य बालके मृत्यूशी झुंज देत आहेत. त्याला या पदांची रिक्तता हे प्रमुख कारण असून पंकजा मुंडे या रिक्त पदांची उद्या तरी पूर्तता करीतअसल्याची घोषणा करतील काय?शिक्षण विभागात पालघर जिल्ह्या कार्यालया अंतर्गत ३४ पदे भरावयाचा निर्णय २५/७/२०१४ रोजी झाला होता. त्यातील ८ पदे भरण्यात, त्या नंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करूनही उर्वरीत २६ पदे भरली जात नव्हती. अखेरीस शिक्षण विभागाला काल जाग येऊन त्यांनी ही २६ पदे मंजूर केली. हाच अनुभव प्रामुख्याने पंकजा मुंडे यांच्या ग्रामविकास व महिला ग्रामविकास खात्यांतर्गत रिक्त पदा बाबत दिसून येत आहे. किंबहुना जिल्ह्यातील बालमृत्यूसाठी पालकमंत्री विष्णू सवरा यांना जबाबदार धरतांनाच महिला बाल विकास मंत्रीही तितक्याच जबाबदार आहेत हेच यातून दिसत आहे.>अंगणवाड्यांची भूमिका अत्यंत महत्वाची१३ गटाअंतर्गत २५७९ व ६०४ मिनी अंगणवाड्याची कुपोषणाच्या निर्मूलनाबाबत अत्यंत महत्वाची भूमिका आहे. ० ते ६ वयोगटातील मुलांची जबाबदारी तसेच गरोदर मातांची जबाबदारीही यातील अंगणवाडी सेविकांवर असते. त्याचबरोबरीने यावर देखरेख ठेवण्यासाठी बाल विकास प्रकल्पाधिकारी यांची भूमिकाही त्याहून महत्वाची असते. असे असतानाही कुपोषणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्पाधिकाऱ्यांची १३ पैकी १२ पदे रिक्त राहावीत व अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच मिनी अंगणवाडी सेविकांची पदेही रिक्त राहावीत ही गंभीर बाब आहे. जिल्हा निर्माण झाल्यापासून पालघर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांची वारंवार भेट घेऊन हि बाब त्यांच्या निदर्शनास आणून देखील त्याकडे पंकजा मुंडे यांनी दुर्लक्ष करावे याबद्दलही त्यांच्याच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात कुपोषणाचा विषय गाजत असताना आतातरी महिला बाल विकास मंत्र्यांनी पदभरतीची प्रक्रि या तात्काळ राबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.