बेळगाव : बेळगाव येथील हुतात्मा दिन कार्यक्रमात सहभागी होण्यास मज्जाव करीत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली. यामुळे बेळगावसह सीमाभागात तणाव निर्माण झाला होता. काही वेळानंतर यड्रावकर यांना पोलीस बंदोबस्तात परत महाराष्ट्राच्या हद्दीत नेऊन सोडण्यात आले.
बेळगावसह सीमाभागात १७ जानेवारीला हुतात्मा दिन साजरा केला जातो. कार्यक्रमास महाराष्ट्रातील नेते येऊ नयेत यासाठी कर्नाटक पोलिसांनी शुक्रवारी पहाटेपासूनच महामार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली होती. यड्रावकर सकाळी महाराष्टÑाच्या एसटीने कर्नाटक हद्दीतील कोगनोळी येथे गेले. कर्नाटक पोलिसांना चकवा देत कर्नाटक एसटीने कार्यक्रम स्थळाजवळ गेले. पोलिसांनी त्यांना रोखले. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांना समजाविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दडपशाही करत त्यांना अटक केली.राजशिष्टाचारानुसार कर्नाटक सरकारला आपला दौराही कळविला होता. मात्र पोलिसांकडून करण्यात आलेली दडपशाही निषेधार्ह आहे. लोकप्रतिनिधीला अशी वागणूक मिळत असेल, तर येथे ६० वर्षांपासून राहणारे मराठी बांधव काय यातना भोगत असतील, हे दिसून येत आहे. - राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य