'मंत्रीपद रुबाब दाखवायला नाही; काळ उत्तर देईल', नितेश राणेंना महायुतीतील मंत्र्यानेच सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 15:22 IST2025-03-16T15:21:58+5:302025-03-16T15:22:19+5:30
भाजप नेते नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

'मंत्रीपद रुबाब दाखवायला नाही; काळ उत्तर देईल', नितेश राणेंना महायुतीतील मंत्र्यानेच सुनावले
Dattatray Bharne on Nitesh Rane: भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम समाजाबद्दलच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळे फक्त विरोधच नाही, तर महायुतीमधील नेतेही त्यांच्यावर टीका करत आहेत. अशातच, अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अप्रत्यक्षपणे नितेश राणेंना खडेबोल सुनावले आहेत.
इंदापूरमध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा भव्य नागरी सन्मान करण्यात आला होता. यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूरकर खूप वेगळी माणसे आहेत. निवडणुका संपल्यावर जोडे बाजूला ठेवायचे असतात. आज मुस्लिम समाजाबद्दल काही ठिकाणी चुकीचा प्रचार केला जात आहे. इंदापूर तालुक्यातील मुस्लिम माणसांनी नेहमी चांगल्या विचाराला माणसाला साथ दिली आहे. मंत्रीपद हे फक्त रुबाब दाखवण्यासाठी नसते. काळ तुम्हाला उत्तर देईल. अल्पसंख्यांक लोकांनी गैरसमज दूर करावा आणि खरे-खोटे पाहावे, अशी टिप्पणी दत्तात्रय भरणे यांनी केली. त्यांची टीका नितेश राणेंना असल्याचे बोलले जात आहे.
हर्षवर्धन पाटलांनाही टोला
यावेळी दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांनाही जोरदार टोला लगावला. इंदापूरची माणसे फार हुशार आहेत. ढोंग करणाऱ्याला महत्त्व देत नाहीत. मी कमी वाजवतो, पण इंदापूरची लोक योग्य ते करतात, असा टोला मंत्री भरणेंनी हर्षवर्धन पाटलांना नाव न घेता लगावला.