मुंबई : एका मंत्र्याच्या शहरात मंडी टोळी नावाची एक कुख्यात टोळी असून या टोळीकडे किमान ४ हजार शस्त्रे आहेत. जागा-घरे खाली करणे, खंडणी वसुली करणे, अवैध सावकारी, सुपारी घेणे असे सर्व उद्योग ही टोळी करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत केला.विधानसभेत नियम २९३ नुसार विरोधी पक्षांनी मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, राज्यातील मंत्रीच गुंडाना पोसत आहेत. एका मंत्र्याच्या शहरात मंडी टोळी नावाची एक कुख्यात टोळी कार्यरत असून या सरकारच्या कौशल्य विकास योजनेत शाम जयस्वाल आणि बंटी जयस्वाल यांच्या मंडी टोळीचे गुन्हेगारी कौशल्य प्रचंड विकसित झाले आहे. आज त्या शहरात इतकी प्रचंड दहशत निर्माण झाली आहे की, त्यांच्याविरूद्ध एक शब्द उच्चारण्याचीही कोणाची ताकद नाही. या टोळीला राज्यातील एका मंत्र्याचाच खुला पाठिंबा आहे की नाही, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी गुप्तचर विभागाकडून खातरजमा करून घ्यावी, असे आव्हान विखे यांनी दिले.मुंबई शहरालगत राहणाऱ्या एका मंत्र्यांच्या चेल्यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात हैदोस घातला आहे. कारखान्यांवर बनावट धाडी घातल्या जात आहेत. त्यांच्याकडून खंडणीवसुली होते आहे. नगरसेवकांच्या खुनाच्या सुपाºया दिल्या जात आहेत. राज्यातील मंत्रीच गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत. तरीही मुख्यमंत्री त्याकडे दुर्लक्ष का करतात, अशी विचारणा विखे पाटील यांनी यावेळी केली.भीमा-कोरेगाव दंगल सरकार पुरस्कृतभीमा-कोरेगाव दंगल ही सरकार पुरस्कृत होती, असा आरोप विखे-पाटील यांनी केला. त्यामुळे सरकार या प्रकरणातील संशयीत आरोपी मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरूजी यांना सरकार वाचवू पाहते आहे. सर्वोच्च न्यायालयात जामीन नामंजूर होईस्तोवर एकबोटेंना सरकारने अटक केली नाही. आम्हाला एकबोटे सापडत नाही, असे सर्वोच्च न्यायालयात सरकार लेखी देते, याकडेही विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.न्या. लोया यांच्या मृत्यूबाबत अनेक गंभीर पुरावे समोर आले आहेत. हृदयविकाराचा त्रास असणाºया लोयांना दंदे आर्थाेपेडिक हॉस्पिटलला नेले जाते, तेथील इसीजी बंद असते. म्हणून मेडिट्रिना हॉस्पिटलला हलवले जाते. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता, असे ते हॉस्पिटल सांगते. हॉस्पिटलच्या बिलानुसार लोयांवर न्युरोसर्जरी केली होती, अशीही माहिती समोर येते. जर रूग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता तर या हॉस्पिटलने त्यांच्या मृतदेहावर सर्जरी केली का, असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला.
मंत्रीच गुंडांना पोसतात; विखे पाटलांचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 2:27 AM