मुंबई : राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची स्थिती असून, मंत्र्यांनी गावागावात जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिपरिषदेच्या बैठकीत दिले.मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भावर दुष्काळाचे गंभीर सावट अधिक गडद होत आहे, याबद्दल बैठकीत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. दुष्काळ निवारणाच्या नियोजनाची जबाबदारी महसूल आणि मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यावर सोपविली.दुष्काळग्रस्त तालुक्यांसंदर्भात ३१ आॅक्टोबरपर्यंत राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी सर्व मंत्री हे मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर करणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार,जळगाव व अहमदनगर सह मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. त्यानुसार कमी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागास देण्यात आले आहेत. दुष्काळ जाहीर करण्याबाबत केंद्राच्या निकषानुसार ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लवकरच दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मंत्र्यांनो, गावागावात जा; मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 6:12 AM