मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पंतगराव कदम (वय 73) यांचे नुकतेच दीर्घ आजाराने मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. भारती विद्यापीठाची स्थापना करून त्यांनी राज्यभरात शिक्षणाची गंगा पोचविण्यात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांचे पार्थिव पुण्यातील भारती विद्यापीठात उद्या सकाळी साडेदहा वाजता आणणार आहेत. सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पंतगराव कदम यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राला धक्का बसला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण, यांच्यासह विविध मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
परखड आणि रोखठोक बोलण्यासाठी परिचित असलेले पतंगराव कदम राजकीय क्षेत्रात चाळीस वर्षाहून अधिक काळ ते कार्यरत होते. काँग्रेसचे निष्ठावंत असलेल्या पतंगरावांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तब्बल २० वर्षाहून अधिक काळ अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. यामध्ये महसूल, उद्योग, सहकार, वने, पुनर्वसन व मदत, शिक्षण या खात्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही त्यांचे अनेकदा नाव आले. तत्परतेने आणि धाडसी निर्णय घेणारे मंत्री म्हणून त्यांची राज्यात छाप होती.
भूषवलेली मंत्रिपदे -जून 1991 ते मे 1992 - शिक्षण राज्य मंत्री. मे 1992 ते 1995 - शिक्षणासाठी मंत्री, (स्वतंत्र पद ). ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2004 - उद्योग, व्यापार, वाणिज्य व संसदीय कामकाज मंत्री. नोव्हेंबर 2004 पासून - सहकार, पुनर्वसन आणि मदत कार्यसंबंधातील मंत्री. प्रभारी अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीडिसेंबर 2008 पासून - महसूल, पुनर्वसन आणि मदत कार्य, भूकंप पुनर्वसन आणि शाळा शिक्षण, महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री.मार्च 2009 पासून - महसूल मंत्रिमंडळ, महाराष्ट्र सरकार.नोव्हेंबर 2009 पासून, महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या कॅबिनेट मंत्री. 19 नोव्हेंबर, 2010 नंतर, वन मंत्री, पुनर्वसन व मदत कार्य, भूकंप पुनर्वसन, शासकीय मंत्री महाराष्ट्र 19 ऑक्टोबर, 2014 नंतर, आमदार आणि माजी वरिष्ठ कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र सरकार