- यदु जोशी, मुंबई
राज्यातील बहुतेक सगळे मंत्री महत्त्वाची शासकीय कागदपत्रे, फायली आदींवर लाल अथवा हिरव्या शाईने शेरे लिहितात किंवा सह्या करतात. मात्र ही बाब पूर्णत: नियमबाह्य असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.मंत्र्याचे पीए म्हणजे ‘चहापेक्षा किटली गरम’ अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडे केली होती. या पार्श्वभूमीवर, माहिती अधिकारात याबाबत माहिती घेतली असता, शासनाने मंत्र्याचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी आणि स्वीय साहाय्यक यांचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या निश्चितच केलेल्या नाहीत, असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले.निळ्या, लाल, हिरव्या शाईने सह्या करण्याच्या मंत्र्याच्या कार्यपद्धतीबाबत नेमके काय नियम आहेत, अशी विचारणादेखील राज्य शासनाच्या सेवेतील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने माहिती अधिकारात केली होती. यावर विभागाने राज्यपालांच्या आदेशानुसार ९ डिसेंबर १९५९ रोजी काढण्यात आलेल्या शासकीय परिपत्रकाचा संदर्भ देत स्पष्ट केले की, शासकीय टिप्पणी, मसुदा यावर तसेच शासकीय पत्रव्यवहार करताना निळ्या किंवा निळ्या/काळ्या शाईचाच वापर करावा. सहीसाठी इतर कोणत्याही शाईचा वापर करू नये, असा नियम आहे.अलीकडे पीए, पीएसमुळे राज्य सरकारमधील काही मंत्री अडचणीत आले. या अधिकाऱ्यांचे नेमके अधिकार कोणते याविषयी चर्चा सुरू झाली. मात्र असे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या निश्चितच केलेल्या नसल्यामुळे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध करून देता येणार नाही, असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.अधिकारांचे अर्थ लावताना केली जाते मनमानीसध्याच्या अनेक मंत्री कार्यालयातील पीए, पीएस, ओएलसी हे त्यांच्या अधिकारांचे अर्थ आपापल्या सोयीने लावून घेतात. त्यातील काही जण टिप्पणी तयार करतात. त्यावर शेराही स्वत:च लिहितात आणि फक्त मंत्र्याची सही घेतात. जवळपास २० वर्षे वेगवेगळ्या मंत्र्याकडे पीए, पीएस राहिलेल्या एका अधिकाऱ्याच्या मते शासकीय फाइलमधील गोषवारा मंत्र्यांना समजावून सांगणे, मुख्यमंत्र्यांनी विभागाशी संबंधित बोलाविलेल्या बैठकीतील विषयांसंदर्भात मंंत्र्यांना अवगत करणे, मंत्रिमंडळ बैठकीसमोर येणाऱ्या विभागाच्या प्रस्तावांविषयी नेमकी स्थिती मंत्र्यांना सांगणे, केंद्र सरकारशी संबंधित पत्रव्यवहार सांभाळणे या पीएसच्या जबाबदाऱ्या असतात. त्याचे विकेंद्रीकरण त्यांनी पीए, ओएलसीमध्ये करणे अपेक्षित असते, असे स्पष्ट केले. हे परंपरेने चालत आले आहे. याची कार्यनियमावली नाही, अशी पुस्तीही या अधिकाऱ्याने जोडली.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सह्यांसाठी लाल पेन वापरत नसत. वसंतराव नाईक यांच्यापासून लाल शाईचे पेन वापरायची पद्धत सुरू झाली. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाल शाईचा उपयोग करतात. मुख्यमंत्री हे घटनात्मक पद असल्याने त्यांना हा अधिकार असल्याचे समर्थन केले जाते. लाल शाईने आदेश दिला म्हणजे ते काम तातडीने करायचे असते, असा संकेत असल्याचे प्रशासनात मानले जाते.