मुंबई : सह्याद्रीवर शनिवारी झालेल्या बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अंगणवाडी पोषण आहारासाठी १०० टक्के निधी देण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र बालगृहातील अनाथ बालकांच्या पोषण आहार निधीबाबत ना अर्थमंत्री बोलले ना महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेनी हा विषय काढला. परिणामी, बालगृहांप्रतीची शासनाची उदासीनता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. महिला व बालविकास विभागाची अर्थसंकल्पपूर्व बैठक सह्याद्री अतिथीगृहावर घेण्यात आली. या बैठकीस अर्थमंत्री मुनगंटीवार, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रधान सचिव संजय कुमार यांची उपस्थिती होती. पोषण आहाराबाबत धोरण आखण्यात येत असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. मात्र बालगृहांच्या थकित १२५ कोटींचा विषय प्रधान सचिव संजय कुमार यांनी काढलाच नाही, परिणामी वित्तमंत्र्यांना बालगृहांचा विषयच टाळल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे सुुभेदारी विश्रामगृहावर बालगृह चालकांना मुंबईत ‘सह्याद्री’वर होणाऱ्या बैठकीत बालगृह परिपोषण निधीबाबत निर्णय घेण्याचा शब्द दिला होता, शिवाय राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनीही मुंबईत चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या भेटी दरम्यान वित्तमंत्र्यांच्या बैठकीत बालगृहांच्या अनुदानाचा विषय मांडून प्रलंबित अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र या बैठकीत वित्तमत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मुंडे आणि ठाकूर यांनी अंगणवाडी ‘पोषणा’लाच ‘झुकते माप’ देऊन बालगृहांतील अनाथ बालकांच्या पोषणावर अन्याय केल्याची भावना बालगृहचालकांनी आदींनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
बालगृहांच्या प्रश्नाबाबत मंत्र्यांची ‘चुप्पी’
By admin | Published: February 16, 2015 3:54 AM