मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचे रविवारी खाते वाटप होताच अनेक मंत्र्यांनी सोमवारी आपापल्या खात्यांचा पदभार स्वीकारून कामाला सुरूवात केली. बहुतेक मंत्री आज मंत्रालयात हजर असल्याने त्यांना भेटणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्य सचिवांच्या शेजारचे दालन मिळाले आहे. या दालनाची रंगसफेदी सुरू असल्याने त्यांनी पहिल्या मजल्यावरुन आपले कामकाज पाहिले. अजित पवारांना भेटण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. काही जण वारंवार त्यांच्यापुढे जात होते. ते लक्षात आल्यानंतर अजितदादा म्हणाले, ‘पुन्हा पुन्हा कशाला येता, काम काय ते सांगा... तुम्हाला आमदारकी पाहिजे की काय!’ त्यावर उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला.>वळसेंच्या दालनाला वाळवी!राज्य उत्पादशुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनाची डागडुजी सुरू असताना यापूर्वी दालनात लावलेल प्लायवूड कुजलेल्या व वाळवी लागलेल्या अवस्थेत आढळले. याआधी हे दालन तत्कालीन राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे होते. दालनाची डागडुजी न झाल्याने शेवटी वळसे यांनी आपल्या विभागाच्या आढावा बैठका सातव्या मजल्यावर जाऊन घेतल्या.>अशोक चव्हाण सह्याद्रीवर!सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या दालनात फक्त साफसफाई करुन रंगाचा एक हात मारुन घ्या, अशी सूचना केली होती. मात्र दोन दिवसानंतरही हे काम न झाल्याने सह्याद्री विश्रामगृहातून त्यांनी कामकाजाला सुरूवात केली. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची कामे करताना ती ठरलेल्या वेळेत झाली पाहिजेत. दर्जा राखला गेला पाहिजे. त्यासाठी जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.>दालन तेचमंत्री नवे!जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना तत्कालिन गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना तत्कालिन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे दालन मिळाले आहे. मात्र, दोघांनीही दालनात कोणतीही डागडुजी अथवा रंगसफेदी न करता आहे त्या दालनातून कामकाजाला सुरूवात केली.
मंत्र्यांनी सुरू केले कामकाज, उपमुख्यमंत्र्यांकडे गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 4:40 AM