राज्य मंत्रिमंडळाचा गेले ३८ दिवस रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी ११ ला राजभवनवर होणार आहे. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. शपथविधी समारंभासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आदींना निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिपद हा आमचा हक्कच असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
“फार महत्त्वाचे निर्णय केले पाहिजे त्यासाठी आम्ही आग्रही राहू. मंत्रीपदाचा विषय तो आमचा हक्का आणि तो आम्ही मिळवणारच. त्याबद्दल शंका नाही. ते आम्हाला मिळणारही आहे,” असे बच्चू कडू म्हणाले. हे सरकार मित्रपक्ष आणि अपक्षांशिवाय राहू शकत नाही. त्याचा विचार व्हावा असं आपलं मत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
“राजकारणात गोपनीयता ठेवावी लागते. त्यात काही उघडपणे सांगितलं जात नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला आहे. येणारा जो विस्तार होईल तेव्हा स्थान मिळेल. आम्ही शब्द दिला आहे असं त्यांनी सांगितलं. आता काही तांत्रिक कारणं असतील. काही पावलं मागे घेणं, पुढे जाणं, त्याग करणं अशा गोष्टींशिवाय राजकारण मजबूत होत नाही हे आम्हाला माहित आहे. ते आपल्या शब्दावर ठाम राहतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.