लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आठ महिन्यांपूर्वी सामूहिक बलात्कार झालेल्या विशेष अल्पवयीन मतिमंद मुलीचे पुन्हा अपहरण होण्याची धक्कादायक घटना मालाड (पूर्व) येथे घडली असून याबाबत दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे उद्या सोमवारी पाच आरोपींची ओळख परेड व्हावयाची असतानाच दोन दिवस आधी हे अपहरण झाले आहे. पीडित मुलीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.मालाड (पूर्व) येथे राहणारी बळीत मुलीची आई घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. तिची सोळा वर्षीय मतिमंद मुलगी २१ आॅक्टोबरपासून बेपत्ता झाली होती. शोध घेऊनही ती न सापडल्याने दुसऱ्या दिवशी दिंडोशी पोलीस ठाण्यात मिसिंग कम्प्लेंट दाखल करण्यात आली. सगळीकडे शोध सुरू असतानाच मालवणी येथील एका व्यक्तीने आपण त्या मुलीला दाणापाणी परिसरात फिरताना पाहिल्याचे सांगितले. २८ आॅक्टोबर रोजी मुलगी पालकांनाच दाणापाणी परिसरात फिरताना आढळली. मुलीकडे केलेल्या चौकशीत राहुल गेचंद, नितीन सारसर, नवीन सारसर, बॉबी गुस्सार आणि विजय गुस्सार यांनी बलात्कार केल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली.आरोपींनी मुलीला दाणापाणी येथे सोडल्यानंतर ती सापडेपर्यंतच्या कालावधीत आरोपी दररोज रात्री रिक्षाने तेथे जाऊन तिला निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार करीत, असे तपासात आढळले. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. त्यानंतर आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली. पीडित मुलगी या बलात्कारातून गर्भवती झाल्यानंतर १७ आठवड्यांनंतर न्यायालयाच्या आदेशाने खासगी हॉस्पिटलमध्ये तिचा गर्भपात करण्यात आला. अटक आरोपींचे कुटुंबीय तक्रार मागे घेण्यासाठी धमकावत असल्याची तक्रार एका निवेदनाद्वारे पीडितेच्या आईने केली होती. या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात यावा, असे निवेदन राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना दिले होते. तसेच मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र तरीही या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात आले नाही. १७ जुलैला आरोपींच्या ओळख परेडला उपस्थित राहण्याबाबत मुलीच्या आईला पोलिसांनी शनिवारी समन्स पाठवले आणि त्यानंतर मुलगी या परिसरातून बेपत्ता झाल्याने पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन बलात्कारित मुलीचे पुन्हा अपहरण
By admin | Published: July 17, 2017 1:45 AM