ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 07 - एखाद्याने हल्ला केला तर तो स्वसंरक्षणासाठी कसा परतवून लावायचा, त्यांच्यावर कसा हल्ला करायचा यासाठी कराटेचे प्रशिक्षण देणाऱ्या सर्वजीत सिंग (४७) या प्रशिक्षकानेच विद्यार्थिनीचा गेल्या दोन वर्षांपासून विनयभंग केल्याचा प्रकार राबोडी भागात घडला. या मुलीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सर्वजीत सिंग हा या १३ वर्षीय पिडीत मुलीसह वृंदावन सोसायटीतील १५ ते २० मुलांना कराटेचे प्रशिक्षण देतो. मे २०१५ पासून तो तिला कराटेचे प्रशिक्षण देत होता. तेंव्हापासूनच त्याने अनेकदा तिचा विनयभंग केला. परंतु, कराटे प्रशिक्षणाचाच एक भाग समजून तिने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. तिने याबाबत तिच्या आईकडे तक्रार केल्यानंतर त्याने कराटेचे स्वसंरक्षणासाठी हल्ली कसे महत्त्व आहे, हे त्यांनाही पटवून दिले. त्यामुळे तिच्या आईच्या आग्रहाखातर तिला पुन्हा या क्लासला जावे लागले. त्यानंतर तो तिला क्लास संपल्यानंतर घरी येऊन हॉलमध्ये जादा प्रशिक्षण देऊ लागला. पण, त्याच्या या हरकती वाढतच गेल्या. पुढे त्याने तिला धमकावून तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो व्हाटसअॅप आणि इन्स्टाग्रामवर त्याच्या मोबाईलवर मागविले. आता हे फोटो इंटरनेटवर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने तिच्याशी चाळे सुरुच ठेवले. अखेर आपल्याला क्लासला जायचेच नसल्याचे तिने आईला पुन्हा ठामपणे सांगितले. आईने तिला याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर या सर्व प्रकाराचा उलगडा झाला. अखेर तिने हा क्लास बंद केला. त्यावर संतापलेल्या सर्वजीतने क्लास बंद केला तर ते फोटो व्हायरल करण्याची पुन्हा आईलाही धमकी दिली. कहर म्हणजे त्या मुलीच्या आईशीही त्याने तसेच चाळे करण्याचा प्रयत्न केला. अखेर या संपूर्ण प्रकाराला कंटाळून या मायलेकींनी धाडस करुन ६ जुलै २०१७ रोजी याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी विनयभंगासह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण, माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७ ब चे ब आणि क आदी कलमांखाली हा गुन्हा दाखल केला. सर्वजीत याला तत्काळ अटक केली असून ठाणे न्यायालयाने १० जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी दिली आहे.