मुंबई : आई ओरडली म्हणून 15 वर्षांच्या मुलीने घर सोडले आणि अल्पवयीन प्रियकराकडे तिने लग्नाची गळ घातली. मात्र, त्यानेही नकार दिल्याने तिने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. तिच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत शोध सुरू केला. नातेवाईक, मित्र मंडळींकडील चौकशीतून मुलीच्या प्रेमप्रकरणाची माहिती समोर आली. हाच धागा पकडत पोलिसांनी मुलीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी प्रियकराच्या मदतीने लग्नास होकार देण्याचा बनाव आखत तिला मुंबईत आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिला कल्याण स्थानकातून सुखरूप ताब्यात घेतले.मूळची अलाहाबादची रहिवासी असलेली 15 वर्षांची नेहा (नावात बदल) देवनार परिसरात राहते. शाळेतून वेळेत घरी येणे, कुणाशी जास्त बोलू नये, अभ्यासाबाबत कुटुंबीयांकडून होत असलेल्या ऊठबस तगाद्यामुळे नेहा वैतागली. याच दरम्यान आई ओरडली म्हणून तिने घर सोडले. ही बाब तिने तिच्या प्रियकराला सांगितली आणि त्याच्याकडे लग्नाची मागणी केली. मात्र, अल्पवयीन असल्याने त्याने लग्नास नकार दिला.सर्वांनीच साथ सोडल्याने नेहाने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. मिळेल त्या लोकलमधून प्रवास सुरू केला. प्रवासातच सहा दिवस गेले. सहाव्या दिवशी तिच्या प्रियकाराला तिने लॅण्डलाइनने कॉल केला. प्रियकराने तिची पुन्हा समजूत काढली. मात्र, ती तिच्या निर्णयावर ठाम होती. अखेर पोलिसांनी त्याला लग्नास होकार देण्याचा बनाव करण्यास सांगितले. पोलिसांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला.
आई ओरडली म्हणून मुलीने सोडले घर अन् अल्पवयीन प्रियकराला घातली लग्नाची गळ, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 8:27 AM