ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २१ - अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना बुधवारी रात्री ईमामवाड्यात घडली. या घटनेमुळे मध्यरात्रीपासून इमामवाडा परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे.
पीडित मुलगी १२ वर्षांची असून, ती बुधवार सायंकाळी शिकवणी वर्गाला गेली होती. वर्ग आटोपून घरी परत जात असताना रस्त्यात तिला एक आरोपी भेटला. त्याने तिला फूस लावून एका मित्राकडे नेले. तेथून मेडिकलच्या टीबी वार्ड परिसरात नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला. रात्री १२ वाजले तरी मुलगी घरी परत आली नाही. त्यामुळे तिची शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर ही संतापजनक घटना उघडकीस आली.
या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर ईमामवाडा पोलिसांनी आरोपीची शोधाशोध सुरू केली. तर परिसरातील संतप्त नागरिकांनीही आरोपींना शोधण्यासाठी त्याच्या घरासह नातेवाईकांकडेही धाव घेतली. मात्र, तो मिळाला नाही. या घटनेमुळे मुलगी प्रचंड दहशतीत आली असून, तिला व्यवस्थीत माहितीही देता येत नसल्याने या घटनेतील अनेक पैलू उघड झाले नाही.