ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 11 - एका अल्पवयीन मुलीला महिनाभरापूर्वी घरातून पळवून नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार करणा-यास पुंडलिकनगर पोलिसांनी नागपूर येथून पकडण्यात आले आहे. त्याच्या तावडीतून पीडितेची मुक्तता करण्यात पोलिसांना यश आले.
शुभम भिकूलाल जाट असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, शुभम जाट याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पीडिता गारखेडा परिसरातील शिवाजीनगर येथील रहिवासी आहे. १४ डिसेंबर रोजी पीडिता भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारात गेली असता आरोपीने तिला ब्लेडचा धाक दाखवून तिचे अपहरण केले.
यानंतर तो तिला घरी घेऊन गेला. तेथे महिनाभर एका खोलीत डांबून ठेवल्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर तो तिला नागपूर येथे बळजबरीने घेऊन गेला. तेथे त्याने पीडितेला डांबून ठेवल्याची माहिती खब-याने मुकुंदवाडी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ए. के. मुदिराज, उपनिरीक्षक रामचंद्र पवार, उपनिरीक्षक अनिता फसाटे, पोलीस कर्मचारी दीपक देशमुख,पारधे, सुलाने आणि महिला कर्मचारी शिंगणे शुक्रवारी नागपूर येथे जाऊन आरोपीच्या तावडीतून पीडितेची मुक्तता केली. शिवाय शुभमला अटक करून ते औरंगाबादेत घेऊन आले. आरोपीविरोधात अपहरण, अत्याचार आदी कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शुभम हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार
शुभम जाट विरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यांत विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांवर हल्ला करणे, वाहने जाळणा-या टोळीचा तो सूत्रधार होता. याशिवाय लुटमार करणे, मारहाण करणे आदी स्वरूपाच्या गुन्ह्यांत तो पोलिसांना वॉन्टेड होता.