नवी मुंबई : मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे. एका स्वयंसेवी संस्थेने हा प्रकार उघडकीस आणला असून या प्रकरणी वाशी रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
मानखुर्द रेल्वे स्टेशनच्या वापरात नसलेल्या तीन नंबर प्लॅटफॉर्मवर बेघर नागरिक वास्तव्य करतात. येथील मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी एका सामाजिक संस्थेने काम सुरू केले आहे. या मुलांची वैद्यकीय चाचणी केली असता १६ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. याविषयी माहिती घेतली असता अबू पंडाराम नावाच्या तरुणाने या मुलीला लग्न करण्याचे आमिष दाखविले होते. तिच्यावर जानेवारी ते एप्रिल २0१४ दरम्यान अतिप्रसंग केल्याचे निदर्शनास आले . याविषयी तत्काळ मानखुर्द रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेथून तो वाशी
रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये वर्ग
करण्यात आला आहे. आज रात्री वाशी रेल्वे पोलिसांनी हा गुन्हा वर्ग करून पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती रेल्वे पोलिस नियंत्रण कक्षाने दिली. रात्री उशिरापर्यंत आरोपीस अटक करण्यात आली नव्हती. याविषयी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजश्री गोरे करीत आहेत.
ठाणे अंमलदाराची लपवाछपवी
अल्पवयीन मुलीवरील अतिप्रसंगाच्या गुन्ह्याची माहिती वाशी रेल्वे पोलिस स्टेशनमधील ठाणे अंमलदार सहायक पोलिस निरीक्षक अलिप रामा पटारा यांनी लपविण्याचा प्रयत्न केला. याविषयी माहिती विचारली असता, आमच्याकडे गुन्हा दाखल नाही. तपास सुरू आहे. अधिकारी घटनास्थळी गेले आहेत, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. गुन्हा दाखल झाल्याची माहितीही सांगण्यात येत नव्हती.