ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. 9 - श्रीगोंदा येथील एका बालवाडीतील पाच वर्षांच्या बालिकेवर एका अल्पवयीन मुलानेच अत्याचार केला आहे. ही घटना बुधवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. कोपर्डी येथील घटनेची जखम ताजी असतानाच हिरडगाव येथील या घटनेने मन सुन्न झाले आहे.
या घटनेप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री अकरा वाजता अत्याचारचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. पीडित मुलगी आजीबरोबर दर्शनासाठी गावातील देवीच्या मंदिरात गेली होती. देवीचे दर्शन घेतल्यानंतर आजी मंदिराबाहेर येऊन गप्पा मारत बसली आणि चिमुरडी मंदिर परिसरात खेळत असताना मुलाने तिला मंदिराच्या मागे नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
या दुर्देवी घटनेचे हिरडगाव परिसरात तीव्र पडसाद उमटले आहेत. गुरूवारी सकाळी हिरडगाव येथे सर्व पक्षीय सभा झाली. या सभेत अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. शाळा- महाविद्यालय बंद ठेवण्यात आले असून हिरडगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. घटना स्थळास पोलीस निरीक्षक अंकुश इंगळे व पोलीस उपनिरीक्षक भरत मोरे, राजेश मनतोडे यांनी भेट दिली.
तसेच ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.