मुंबई - अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांची नियुक्ती झाल्याने अल्पसंख्याक समाजासह सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. नसीम खान यांच्या रुपाने अल्पसंख्याक समाजाला राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व दिल्याबद्दल काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
अल्पसंख्याक समाज हा नेहमीच काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे आणि पक्षानेही वेळोवेळी संधी दिलेली आहे.राहुलजी गांधी, मल्लिकार्जून खर्गे व पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या नवीन जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस व महाविकास आघाडीचे सरकार यावे यासाठी प्रयत्न करू, असे नसीम खान म्हणाले.
काँग्रेस मुख्यालय टिळक भवन मध्ये नसीम खान यांचे स्वागत करण्यात आले. प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित बैठकीत नसीम खान यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित नेत्यांनी नसीम खान यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मंत्री सुरेश शेट्टी, आमदार भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, राजन भोसले, शितल म्हात्रे, ईब्राहिम भाईजान, प्रवक्ते निजामुद्दीन राईन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.