माथेरान : माथेरान येथून नेरळ येथे जात असलेल्या मिनीट्रेनचे १ मे व ८ मे रोजी एकाच ठिकाणी प्रवासी डबे घसरले. त्यानंतर लगेच नेरळ-माथेरान ही घाट सेक्शनवर धावणारी हेरिटेज मिनी ट्रेन बंद करण्यात आली. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे यापुढे मिनी ट्रेन धावेल ती एअर ब्रेक प्रणालीसह, त्यासाठी एअर ब्रेक प्रणाली असलेले नवीन तीन इंजिन आणि दहा प्रवासी डबे यांची खरेदी रेल्वे करेल असे जाहीर केले होते. त्याचवेळी माथेरान घाट सेक्शनवर चालविली जाणारी अमन लॉज-माथेरान शटल सेवा तत्काळ सुरु करण्यात येईल, असे आश्वासनही दिले होते, परंतु आजतागायत एक महिना उलटूनही माथेरान मिनी ट्रेन बंदच आहे.शतक महोत्सव साजरा केलेली मिनी ट्रेन जास्त काळ बंद ठेवू नये यासाठी खासदार, आमदार यांच्यापासून नगरपालिका आणि अनेक राजकीय पक्षांची शिष्टमंडळे थेट रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचली होती. माथेरान हे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून अत्यंत जवळ असलेले एकमेव पर्यटन स्थळ आहे. येथील पर्यटन व्यवसाय हा येथील जनतेच्या उदरनिर्वाहाचा एकमेव व्यवसाय. त्यात ८ मे रोजी मिनी ट्रेन बंद झाल्याने माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम झालेला दिसून येत आहे. रेल्वे मंत्रालयाने अमन लॉज-माथेरान ही शटल सेवा लवकरात लवकर पूर्ववत होईल असे सांगून नवीन इंजिन व एअर ब्रेक प्रणाली असलेली मिनी ट्रेनची दोन वेळा चाचणी घेऊन ती यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले.आणखी एक चाचणी घेऊन शटल सेवा पर्यटक व नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देऊ असे सुद्धा सांगण्यात आले, परंतु अजून तरी माथेरान मिनी ट्रेनची शीळ घुमत नाही.याबाबत पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी आहे. मिनी ट्रेन बंद झाल्याने पर्यटकांनी माथेरानकडे पाठ फिरवली, त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. येथील नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)>मिनीट्रेन माथेरानची जीवनवाहिनीखास मिनी ट्रेनचा आनंद घेण्यासाठी आम्ही कुटुंबासह दरवर्षी माथेरानला येतो. खूप मजा वाटायची मात्र,ही मिनी ट्रेन बंद झाल्याने माथेरानमध्ये का यावे हा प्रश्न पडला आहे.- अनिल भोसले, पर्यटक, नवी मुंबईमाथेरान मिनी ट्रेन ही माथेरानकरांची जीवनवाहिनी होती. परंतु ती बंद असल्याने येथील पर्यटकांचे प्रमाण कमी झाले आहे. - योगेश जाधव, व्यावसायिक,माथेरान
मिनीट्रेन बंदला एक महिना पूर्ण
By admin | Published: June 10, 2016 3:08 AM