लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड: कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुराच्या थैमानाने लाखो लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परंतु मीरा भाईंदर भाजपाने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी साहित्य निधी जमवताना पुरग्रस्तांच्या अश्रूंचा विचार न करता हसत हसत फोटोसेशन केल्याची अनेक छायाचित्रे समाज माध्यमांवर आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
निसर्गाने धारण केलेल्या रौद्र रूपाने कोकणातील रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यात तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली आदी जिल्ह्यात पुराने होत्याचे नव्हते करून टाकले आहे. पुरग्रस्तांचे अश्रूं पुसण्यासाठी विविध स्तरातून मदतीचे हात पुढे आले आहेत.
मीरा भाईंदर मधील अनेक भाजपा नगरसेवक व कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापल्या प्रभागात कोकणातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी साहित्य व निधी जमवण्यासाठी पदफेऱ्या काढल्या. व्यावसायिक व नागरिकांना आवाहन करत भांडी, कपडे, धान्य, खाद्यपदार्थ, पाणी आदी साहित्यासह निधी गोळा केला.
परंतु पुरग्रस्तांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी काढलेल्या ह्या मदतफेऱ्यांत परिस्थितीचे भान राखण्या ऐवजी हसत हसत फोटोसेशन करतानाच अनेकांनी तर चक्क पोझ देत फोटोंची हौस भागवून घेतली. मदतीचा चांगला उपक्रम असताना निव्वळ राजकीय प्रसिद्धीचा फायदा न घेता परिस्थितीचे गांभीर्य राजकारण्यांनी राखले पाहिजे असा सूर नागरिकां मधून व्यक्त होत आहे.