लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे , साफसफाई , रस्त्यावरील खड्डे आदींचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी ' आयुक्तां सोबत चाला ' असा स्थळ पाहणी कार्यक्रम सुरु केला आहे .
मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील राहणाऱ्या नागरिकांच्या साफसफाई बाबत, अनधिकृत बांधकामे, रस्त्यावरील खड्डे या सततच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी लक्षात ठेवून आयुक्त ढोले यांनी शुक्रवार पासून ' आयुक्तां सोबत चाला ' असा प्रत्यक्ष स्थळ पाहणी कार्यक्रम सुरु केला आहे . त्या अनुषंगाने आयुक्तांनी प्रमुख अधिकाऱ्यांसह सकाळी साडे सात वाजल्यापासून प्रभाग समिती क्रमांक ४ येथील रामदेव पार्क ते हटकेश या परिसरात पाहणी दौरा केला.
प्रभागातील सर्व कामे ही कशी पूर्ण केली जातात त्या अनुषंगाने हा पाहणी दौरा करण्यात आला. सदर पायी चालत केलेल्या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त अजित मुठे, डॉ. संभाजी पानपट्टे, मारुती गायकवाड व संजय शिंदे, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता दीपक खांबीत, सहाय्यक आयुक्त सचिन बच्छाव, प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड, उद्यान अधिक्षक नागेश इरकर, स्वच्छता अधिक्षक राजकुमार कांबळे, स्वच्छता निरीक्षक अनिल राठोड सह प्रभाग समिती क्रमांक ४ चे कर्मचारी असा लवाजमा सहभागी झाला होता .
स्वच्छतेला प्राधान्य देत या पाहणीची सुरुवात करण्यात आली. रामदेव पार्क ते हटकेश परिसरात पाहणी दरम्यान रस्त्याच्या बाजूला असलेला कचरा, रस्त्यावर ठेवलेले कचऱ्याचे डब्बे, वृक्षांच्या फांद्या, मोकळ्या जागेवरील मातीचा ढिगारा, रस्त्यावर पडलेले डेब्रिज उचलायला लावून रस्ता व कडेचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश आयुक्त यांनी दिले. ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग होते ते तात्काळ उचलून घेण्यास सांगितले .
परिसरातील पदपथावरील असलेली गटारांची अनेक झाकणे तुटलेली तसेच झाकणेच नसल्याचे आढळले . पदपथ व नाल्यावरील स्लॅब किंवा ब्लॉक निघालेले होते . काही ठिकाणी खड्डे पडलेले होते ते सर्व दुरुस्त करून घेण्यास सांगण्यात आले.
पदपथावर विना परवाना असलेल्या टपऱ्या, रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी तसेच बेवारस वाहने , पदपथ - रस्त्यावरील अनधिकृत गॅरेज , पालिकेने तयार केलेल्या भाजी मार्केटमध्ये न बसता रस्त्यावर बसणारे अनधिकृत फेरीवाले आदींवर कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले . असा पाहणी दौरा प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या प्रभागात केला जाणार असल्याचे आयुक्त ढोले यांनी सांगितले.