हिंगोली : जिल्ह्यातील दिग्रसवाणीमध्ये वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत ग्रामविकास पॅनलला घवघवीत यश मिळाले असून, नऊपैकी आठ उमेदवार विजयी झाले आहेत. यात डॉ. चित्रा अनिल कुऱ्हे या स्वीडनमधून पॉलिटिकल सायन्समधील पीएचडी प्राप्त उमेदवार होत्या. मतदारांनी प्रस्थापित पक्षाचे उमेदवार डावलून डॉ. चित्रा यांच्यासह त्यांच्या पॅनलला भरघोस मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे.आदिवासी समाजातील डॉ. अनिल कुऱ्हे आणि डॉ. चित्रा कुऱ्हे हे दाम्पत्य आठ वर्षे विदेशात होते. त्यांनी स्वीडन, जपान आदी देशांमध्ये वास्तव्य केले आहे. डॉ. चित्रा यांना पाच भाषा अवगत आहेत. भारतात परतल्यानंतर कुऱ्हे दाम्पत्याने दिग्रसवाणी गावात सातत्याने सामाजिक कार्य केले. ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत ग्रामविकास आघाडीतर्फे त्यांनी राजकारणात प्रवेश केला. विशेष म्हणजे, सरपंचपदाची निवडणूक थेट होत नसली तरी वंचितच्या ग्रामविकास आघाडीने डॉ. चित्रा यांनाच सरपंचपदाचा उमेदवार जाहीर करून प्रचार केला. तसेच त्यांच्या आघाडीत महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे. याचा सकारात्मक संदेश जात मतदारांनी त्यांच्या पॅनलला भरघोस मतदान केले.
हिंगोलीतील दिग्रसवाणीत चमत्कार, ‘फॉरेन रिटर्न डॉक्टरेट’चे पॅनल विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 8:36 AM