मिरज : जयसिंगपूर ते हातकणंगलेदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी शनिवार, दि. १६ च्या मध्यरात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत मेगाब्लॉकमुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. यामुळे रविवारी सकाळी सह्याद्री एक्स्प्रेस, सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस मिरजेपर्यंत धावणार आहे. कोल्हापुरातून सुटणारी पुणे पॅसेंजर व हैदराबाद एक्स्प्रेस मिरजेतून सोडण्यात येणार आहे. यामुळे कोल्हापुरातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे. जयसिंगपूर ते हातकणंगलेदरम्यान रेल्वेमार्ग दुरुस्तीसाठी शनिवारी मध्यरात्री एक ते रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. मेगाब्लॉक असल्यामुळे शनिवारी रात्री कोल्हापूरला जाणारी सांगली-कोल्हापूर पॅसेंजर मिरजेतच थांबणार आहे. रविवारी सकाळी कोल्हापूर-पुणे पॅसेंजर मिरजेतूनच पुण्याला रवाना होणार आहे. मुंबईतून कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस मिरजेतच थांबविण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस मिरजेत थांबून विलंबाने कोल्हापूरला पाठविण्यात येण्याची शक्यता आहे. दोन आठवड्यापूर्वी याच ठिकाणी दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र काम अपूर्ण असल्याने रविवारी पुन्हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (वार्ताहर)प्रवाशांची गैरसोयरेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण झाल्यानंतर रविवारी सकाळी आठनंतर मिरज-कोल्हापूर वाहतूक सुरळीत होणार आहे. पहाटे साडेचार वाजता मिरजेत येणारी सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस मिरजेतच थांबणार असून हीच गाडी कोल्हापूर-हैदराबाद एक्स्प्रेस म्हणून मिरजेतूनच हैदराबादला जाणार आहे. कोल्हापुरातून सकाळी सुटणाऱ्या एक्स्प्रेस व पॅसेंजर मिरजेतून जाणार असल्याने कोल्हापुरातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक रविवारी बंद
By admin | Published: January 16, 2016 12:07 AM