ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 18 - काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची भर चौकात हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूरचे काँग्रेसचे माजी नगरसेवक नामदेव भुईटे यांच्यावर कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली. या हल्ल्यात नामदेव भुईटे यांचा मृत्यू झाला. भर चौकात माजी नगरसेवकाची अशाप्रकारे हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
सोमवारी संध्याकाळी सांगलीतील मिरज येथील भोसे फाट्यावर नामदेव भुईटे यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात कोयत्याने त्यांच्यावर वार करण्यात आले. अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यात नामदेव भुईटे यांचा मृत्यू झाला. हा हल्ला का करण्यात आला, हल्ल्यामागे कोण आहे, याचा शोध सध्या सांगली पोलीस घेत आहेत. नामदेव भुईटे हे काँग्रेसचे पंढरपुरातील माजी नगरसेवक होते.
नामदेव भुईटे चार मित्रांसह मिरज येथून रात्री परत येत असताना काही अज्ञातांनी गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी हल्ला करता त्यांच्यासोबत असलेले मित्र आणि गाडीचा चालक यांनी घाबरून घटनास्थळावरुन पळ काढला. भुईटे यांना तातडीने मिरज येथील विशाखा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
सांगली पोलिसांनी आता भुईटे यांच्यासोबत असलेल्या गाडी चालकाची चौकशी सुरु केली असून त्यांसोबतच्या मित्रांचाही शोध सुरु केला आहे.
काही महिन्यांपुर्वी अशाच प्रकारे काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे यांची हत्या करण्यात आली होती. भिवंडीत महानगरपालिकेतील नगरसेवक व काँग्रेसचे गटनेते मनोज म्हात्रे (५३) यांची रात्री गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. रात्री साडेनऊच्या सुमारास येथील ओसवालवाडीमागे, कामतघर येथे त्यांच्यावर चार अनोळखी इसमांनी हल्ला केला होता. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतच त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथं त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. म्हात्रेंवर हल्ला केल्यानंतर दोन्हीही हल्लेखोर फरार झाले होते. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता, अखेर पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आलं. दरम्यान म्हात्रेंची हत्या राजकीय वैमनस्यातून नव्हे, तर कौटुंबिक कारणातूनच झाल्याचं समोर आलं.
मनोज म्हात्रे हे 2002 पासून नगरसेवक असून त्यांनी दोनवेळा स्थायी समितीचे सभापतीपद भूषवले आहे. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे निकटवर्ती म्हणून ते ओळखले जात. हत्येप्रकरणी महेश पंडित म्हात्रे आणि मयूर म्हात्रे उर्फ प्रकाश म्हात्रे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली.