ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - सागरी प्रवास आज जितका सुलभ दिसतो. तसा तो सुरुवातीच्या दिवसांमध्ये नव्हता. हजारो वर्षांपूर्वी सागरी प्रवास सुरु झाला तेव्हा तो अत्यंत धोकादायक होता. सुरुवातीच्या काळात धाडसी दर्यावर्दी समुद्रात आपल्या होडया झोकून द्यायचे. पण किनारा नजरेआड गेली की, काय अनर्थ ओढवेल हे माहिती नसल्यामुळे समुद्राच्या कडेकडेने आपली होडी हाकारायचे.
पुढे हळूहळू अनुभव आणि वेगवेगळया प्रयोगांमधून प्रमाण, दिशा, आक्षांश, रेखांश, निश्चित करुन समुद्रात विविध दिशांना प्रवास सुरु झाला. त्याचवेळी ओंडक्याच्या मदतीने जहाजाचा वेग मोजायची पद्धत विकसित केली. आता स्पीड लॉग या अत्याधुनिक उपकरणाने जहाजाचा वेग मोजतात.
कोलंबसच्या काळात 15 व्या शतकात समुद्रातून वाट शोधण्याच्या वेगवेगळया पद्धती अवगत होत्या. तरीही कोलंबस वाट का चुकला ? युरोपियन दर्यावर्दी त्यावेळी अॅस्ट्रोलेब, दुर्बिणीचा वापर करायचे. पण प्रश्न होता रेखांशाचा. त्या काळात अचूकपणे रेखांश मोजण्याचे गणित सुटलेले नव्हते. त्यामुळे पूर्व-पश्चिम दिशेने आपण किती अंतर आलोय हे कोणालाही खात्रीने सांगता येत नव्हते. अशा परिस्थितीत भारताचे रेखांश माहिती नसलेला कोलंबस पश्चिमेकडे निघाला आणि समोर जो पहिला भूभाग दिसला त्याला भारत समजून बसला.
- महाराष्ट्र विज्ञान परिषदेच्या पत्रिकेतील कॅप्टन सुनील सुळे यांच्या लेखातील काही भाग बातमीरुपाने प्रसिद्ध केला आहे.