मुंबई : पाकिस्तान व चीनपासून देशाला असणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन विविध युद्धनौका आणि युद्धसामुग्रीचा नौदलामध्ये समावेश सुरु असल्याचे नौदलप्रमुख अॅडमिरल आर. के. धवन यांनी सोमवारी स्पष्ट केले. स्वदेशी बनावटीच्या ‘विशाखापट्टणम’ या पहिल्या क्षेपणास्त्र विनाशिकेचे जलावतरण मुंबईतील माझगाव डॉक येथे नौदलप्रमुखांच्या पत्नी मीनू धवन यांच्या हस्ते करण्यात आले. विशाखापट्टणम विनाशिका २0१८ पर्यंत नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. माझगाव डॉकमध्ये प्रकल्प १५ बी अंतर्गत चार क्षेपणास्त्र विनाशिका बांधण्यात येत आहेत. त्यातील पहिल्या विनाशिकेचा जलावतरण सोहळा सोमवारी पार पडला. प्रत्येक युद्धनौका ७ हजार ३00 टन वजनाची असून १६३ मीटर लांबी आहे. चार गॅस टर्बाईन असणारी ही युद्धनौका जास्तीत जास्त ३0 नॉटिकल मैल धावू शकते. सर्व धोके लक्षात घेऊन आणि नवी आव्हाने पाहून आम्ही बहुउद्देशीय क्षमतावृद्धी योजना बनविल्याचे धवन यांनी सांगितले. सध्या विविध प्रकारच्या ४८ युद्धनौका आणि पाणबुड्यांची निर्मिती सुरु आहे. स्वदेशी घटकांचे प्रमाण वाढत असून २६ युद्धनौका आणि पाणबुड्या आपण स्वदेशी स्तरावर बनवून घेतल्याचे धवन म्हणाले. सध्या युद्धनौकांच्या बांधणीत ९0 टक्क्यांहून अधिक स्वदेशीकरण झाले असून त्याची अनेक उदाहरणे आहेत. विक्रांत विमानवाहू युद्धनौका आणि विशाखापट्टणम विनाशिकेत भारतातच बनलेले स्टील वापरण्यात आले आहे. आम्ही पंतप्रधानांचे ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यास कटिबद्ध असल्याचे धवन यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
क्षेपणास्त्र विनाशिका विशाखापट्टणमचे जलावतरण
By admin | Published: April 21, 2015 1:10 AM