ठाणे : ठाण्याच्या वागळे इस्टेट जुनागाव भागातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळसी (जिल्हा सातारा) येथे पळवून नेणाऱ्या पवन उर्फ अमोल मुकींदा आवटे (२२) याला वागळे इस्टेट पोलिसांनी मोठया शिताफीने अटक केली आहे. तब्बल २५ दिवसांनी आपली मुलगी सुखरुप मिळाल्याने तिच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या परिसरातून त्याने तिला पळवून नेले होते. तो बदली चालक म्हणून वेगवेगळया खासगी गाडयांवर काम करीत होता. मूळ वडगाव (ता. माण, जिल्हा सातारा) येथील रहिवासी असलेला पवन ठाण्यात कधी लोकमान्यनगर तर कधी कोपरीमध्ये वास्तव्याला होता. वारंवार ठाण्यात येणे असल्यामुळे महाविद्यालयात जाणाऱ्या या तरुणीला त्याने हेरले होते. वेगवेगळया गाडया वापरुन त्याने तिच्यावर प्रभाव टाकला होता. १७ मार्च रोजी ती महाविद्यालयात आल्यानंतर लग्नाचे अमिष दाखवून तिला त्याने एका कारमधून पळवून नेले. याप्रकरणी १८ मार्च रोजी मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस उपायुक्त विलास चंदनशिवे, वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मदन पाटील यांच्या मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक के. जे. बाबर, हवालदार शशीकांत जाधव यांच्या पथकाने तपास सुरु केला. या पथकाने मुलीच्या वडीलांच्या मदतीने सापळा लावला. त्याचवेळी तोही तिथे आल्यामुळे १० एप्रिल रोजी सकाळी याला ताब्यात घेतले आणि तिची त्याच्या तावडीतून सुटका केली. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अपहरण तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण (पोक्सा) कायद्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
ठाण्यातील बेपत्ता मुलीची साताऱ्यातून सुटका
By admin | Published: April 11, 2016 3:07 AM