- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांची इच्छुक ठिकाणी बदली करुन देणाऱ्या रॅकेटमधील चौकडीच्या अटकेमुळे खळबळ उडाली. मात्र या कारवाईदरम्यान आरोपींचे शिकार होणारे दोघे पोलिसांच्या तावडीत सापडले. अचानक हे दोघे बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी त्यांची मिसिंग तक्रार नोंदवून त्यांचे फोटो चिटकवून शोध सुरू केला. पोलिसांनी या दोघांची सुटका केल्यानंतर तब्बल ३० तासानंतर या मिसिंग मिस्ट्रीला पूर्णविराम मिळाला. मूळचे गुजरातचे रहिवासी असलेले सुरेश (नावात बदल) हे त्यांच्या मित्राच्या कुटुंबासोबत विलेपार्ले परिसरात राहतात. त्यांचा बोरीवली आणि विरार परिसरात जमिनीचा वाद सुरू होता. या जमिनी सोडून देण्यासाठी ९ महिन्यांपूर्वी समाजसेवकाच्या ओळखीने या रॅकेटमधील दिल्लीचा रहिवासी असलेला रवींद्रसिंग मोहबतसिंग यादव उर्फ शर्मा सोबत त्यांची ओळख झाली. रवींद्रसिंगने तो स्वत: केंद्र सरकारच्या सल्लागार कमिटीवर कामावर असल्याचे सांगितले. त्यानंतर सुरेशने त्याची अनेकदा भेट घेतली. वीरेंद्रसिंगच्या बोलण्यात तो अडकत गेला. तब्बल २० दिवस तो त्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये राहून आला. हायप्रोफाईल राहणीमान, त्यात महागड्या गाड्यातून प्रवास, फाईव्ह स्टार हॉटेलमधील बैठकांमुळे सुरेशही त्याच्या जाळ्यात अडकला. त्याने बोरिवलीतील आरटीआय संस्थेचे काम त्यांच्याकडे आणले. संस्थेच्या नावावरचा कोट्यवधींचे धनादेश अडकून राहिले होते. संस्थेचे देवहंस यांना सुरेशकडून याबाबत समजताच त्यांनी त्याच्याकडे यादवसोबत भेट घालण्याचा आग्रह केला. तसेच त्यांनी दिल्ली जाऊनही यादवची भेट घेतल्याचे समजते. सुरेश याने देवहंस याच्यासोबत अकोल्याचे शेतकरी अशोक खाडे यांना कामासाठी भेट घ्यायचे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर यादवने या दोघांना घेऊन ३१ मे रोजी दुपारी १ वाजता सहारा हॉटेलमध्ये येण्यास सांगितले. यादव हा २४ मे रोजी मुंबईत आला होता. मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमधील रुम नंबर २१०२ मध्ये तो वास्तव्याला होता. ठरल्याप्रमाणे ३१ मे रोजी सुरेश हा देवहंस आणि अशोक खाडेसोबत तेथे आला. मात्र बराच वेळ होऊनही त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर तीन वाजता सुरेशने आणि खाडेने खोलीत प्रवेश केला तेव्हा तेथे पोलीस आधीपासूनच चौकशी करत होते. पोलिसांनी सुरेश आणि खाडेला ताब्यात घेत त्यांचे मोबाईल काढून घेत ते बंद केले. दोन्ही मोबाईल बंद झाल्यामुळे सुरेश आणि खाडेचे कुटुंबीय घाबरले. बराच शोध घेऊनही काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी विलेपार्ले आणि विरार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.तब्बल २८ ते ३० तासानंतर त्यांच्या कुटुंबीयांना दोघांची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
बदल्यांच्या रॅकेटच्या चौकशीत दोघांची ‘मिसिंग मिस्ट्री’
By admin | Published: June 04, 2017 1:20 AM