ठाणे : मित्राचे घेतलेले कपडे त्याला परत दे, असे घरातल्यांनी सांगितल्यानंतर ते आपल्याला रागावतील, या भीतीपोटी ठाण्यातील सुनील इंद्रजित विश्वकर्मा हा १५ वर्षीय मुलगा थेट उत्तर प्रदेशातील त्याच्या सिद्धार्थनगरातील मूळ गावी पोहोचला. दरम्यान, त्याच्या अपहरणाची तक्रार आईवडिलांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने पोलीसही शोध घेत राहिले.सुनील हा पडवळनगर येथील नववीतील मुलगा शाळेला सुटी असल्याने १२ फेब्रुवारी रोजी सहलीसाठी गेला होता. तो परतल्यानंतर त्याने सुरज या त्याच्या मित्राचे कपडे घातले होते. ‘हे कपडे ज्याचे आहेत, त्याला दे’, असे त्याच्या घरच्यांनी त्याला बजावल्यानंतर तो ते कपडे देण्यासाठी सुरजकडे गेला. मात्र, पूर्ण दिवस उलटूनही तो घरी परतलाच नाही. अखेर, त्याचे चुलते धरमजित यांनी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास त्याच्या अपहरणाची तक्रार श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक ए. वाय. सावंत यांनी या प्रकरणाचा तपास सुरू करून त्याच्या नातेवाइकांकडेही कुटुंबीयांच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुनील १४ फेब्रुवारीला उत्तर प्रदेशात पोहोचल्याची माहिती धरमजित यांना मिळाली. तो नेमक्या कोणत्या कारणामुळे घरातून थेट यूपीला गेला, याबाबतचा उलगडा तो ठाण्यात आल्यानंतरच होईल, अशी माहिती श्रीनगर पोलिसांनी ‘लोकमत’ला दिली. त्याचे अभ्यासातही लक्ष नसल्याची माहिती पोलिसांना नातेवाइकांकडून मिळाली. (प्रतिनिधी)
ठाण्यातील बेपत्ता मुलगा पोहोचला ‘यूपी’त
By admin | Published: February 16, 2015 3:27 AM