मुंबई : मी कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही. निष्पापांची हत्या इस्लामलादेखील मान्य नाही. माझ्या भाषणांमधून मी अनेकवेळा दहशतवादाचा निषेध केला आहे. मात्र, सध्या माझ्या विधानांचा विपर्यास केला जात असून माझ्याविरोधात चुकीची माहिती देण्यात येत असल्याचा आरोप वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रचारक झकीर नाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. झाकीर नाईक यांच्या भाषणांमधून प्रेरणा मिळाल्याची बांग्लादेशातील दहशतवाद्यांनी कबुली दिल्यानंतर नाईक यांच्याविरोधात टीकेची झोड उठत आहे. बांग्लादेश सरकारनेही नाईक यांच्या पीस टीव्हीवर बंदीची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर सौदी अरब येथूनच स्काईपच्या माध्यमातून नाईक यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. पुर्वनियोजित कार्यक्रमामुळे किमाम पुढील एकवर्ष भारतात परतणे शक्य नसल्याने त्यांनी यावेळी सांगितले.फ्रान्स्मधील नीस येथील दहशतवादी हल्ल्याचा आपण निषेध करतो. त्याचबरोबर ढाक्यामध्ये हल्ला करणा-यांना आपण प्रेरीत केले नव्हते. माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने मला त्यामध्ये जबाबदार धरल्याचा आरोप नाईक यांनी केला. झकीर नाईक यांनी यावेळी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. माझी सर्व भाषणे यु-ट्युबवर आहेत. ज्यांना माझ्याविषयी शंका आहे त्यांनी ती जरुर ऐकावीत. जगात विविध ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची मीं निंदाच केली आहे. निष्पापांची हत्या इस्लामलाही मान्य नाही. विशेषत: आत्मघाती हल्ला गुन्हाच मानण्यात आला आहे. मात्र, युद्धनीतीचा भाग म्हणून आत्मघाती हल्ले मान्य आहे. त्यासाठी युद्धाचे नेतृत्व करणा-यांची परवनगी आवश्यक असते. अशावेळी केलेले दहशतवादी हल्ले चुकीचे ठरत नाहीत. अनेक इस्लामी विद्वानांचेही असेच मत असल्याचा दावा नाईक यांनी केला. मी कधीच दहशतवादी कारवायांचा पुरस्कार केलेला नाही. माझ्या भाषणात काही वाक्ये द्विअर्थी असू शकतात. पण त्यातील नेमका अर्थ समजून घ्यावा. त्या वाक्यांवरून माझ्यावर चुकीचे आरोप करू नका, असे झाकीर नाईक यांनी म्हटले आहे. पीस टीव्ही हे मुस्लीम चॅनल असल्याने भारत सरकारने परवानगी नाकारली, असा आरोपही नाईक यांनी केला. (प्रतिनिधी)
माझ्या विधानांचा विपर्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2016 3:09 AM