अमरावती - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षांच्या इतिहासाच्या पुस्तकात घटक क्रमांक ४ मध्ये देशभक्त क्रांतिकारकांच्या चळवळीचा ‘दहशतवादी क्रांतिकारकांची चळवळ’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. हा प्रकार क्रांतिकारकांचा अवमान करणारा होय, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. याप्रकरणी दोषींना कठोर शासन व्हावे, यासाठी निवेदन सादर केले आहे. मुक्त विद्यापीठाचे अमरावती विभागीय संचालक अंबादास मोहिते यांना सोमवारी अभाविपने दिलेल्या निवेदानातून क्रांतिकारकांचा अपमान करण्यामागे कुणाचा हात आहे, हे स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांची महत्त्वाची भूमिका होती. हे सर्वश्रूत असताना मुक्त विद्यापीठाने बी.ए. द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या पुस्तकात क्रांतिकारकांचा अपमान करून विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात चळवळीचा उगम, वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य, कुका आंदोलन, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे क्रांतिकार्य, बंगाल व इतर प्रांतातील क्रांतिकार्य, भारताबाहेरील दहशतवादी चळवळ, क्रांतिकारकांच्या चळवळीचे अपयश या विषयाचे विवेचन आहे. मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम तयार करताना स्वतंत्र मंडळ असते. त्यामुळे ही गंभीर चूक अभ्यास मंडळाच्या लक्षात येऊ नये, हे आश्चर्य असल्याचे अभाविपने म्हटले आहे. पुस्तकातील चूक त्वरेने दुरूस्त करावी, दोषींवर कठोर शासन व्हावे, अन्यथा राज्यभरात आंदोलन केले जाईल, असा इशारा अभाविपचे प्रदेश सहमंत्री ज्ञानेश्र्वर खुपसे, महानगर सहमंत्री प्रतीक जोशी, शिवानी मोरे, आनंद बुंदले, स्वाती कठाळे, धनश्री जोशी, रोहन देवलसे, अभिषेक काळे, दुर्गेश साठवणे आदींनी दिला आहे. विद्यार्थ्यांना डिस्टंट मोडमध्ये पुस्तक वाटप होतात. मुक्त विद्यापीठाकडून बी.ए. द्वितीय इतिहासाच्या पुस्तकात देशभक्त क्रांतिकारकांच्या चळवळीचा ‘दहशतवादी क्रांतिकारकांची चळवळ’ असा अनावधानाने उल्लेख झाला आहे. ही बाब नाशिक मुख्यालयात कळविली आहे. पुढच्या वर्षी यात नक्कीच सुधारणा होईल. - अंबादास मोहिते, संचालक, मुक्त विद्यापीठ अमरावती विभागीय केंद्र क्रांतिकारकांच्या लढ्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले, हे विसरता येणार नाही. असे असताना मुक्त विद्यापीठाने चक्क क्रांतिकारकांच्या लढ्यालाच दहशतवादी चळवळ, असे संबोधून समस्त क्रांतिकारकांचा अवमान केला आहे. यातील दोषींना कठोर शासन झाले पाहिजे. - ज्ञानेश्वर खुपसे, प्रदेश सहमंत्री, अभाविप
मुक्त विद्यापीठाकडून क्रांतिकारांचा अवमान, बी.ए. द्वितीय वर्षाच्या इतिहास पुस्तकात चूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 7:25 PM