पुणे: जम्मू काश्मिरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्यानंतर महाराष्ट्रातील शिक्षण संस्था जम्मू काश्मिरमध्ये शैक्षणिक संस्था स्थापन करण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. त्यात प्रामुख्याने एमआयटी व सिंबायोसिस सारख्या शिक्षण संस्थांचा समावेश आहे.त्यामुळे केंद्र शासनाकडून सहकार्य मिळाल्यास लवकरच महाराष्ट्रातील नामांकित शिक्षण संस्था काश्मिरमध्ये सुरू झाल्याचे चित्र दिसून येईल. जम्मू काश्मिरमधील अस्थिर परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी पुण्यातील शिक्षण संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी येतात. सरहद सारखी संस्था गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहे. परंतु, 370 कलम रद्द झाल्यामुळे जम्मू काश्मिरमध्ये शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुण्यातील नामांकित संस्थांनी या भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्याच परिसरात शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. एमआयटी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.राहुल कराड यांनी जम्मू काश्मिरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द केल्याबद्दल केंद्र शासनाचे अभिनंदन केले आहे. तसेच एमआयटी शिक्षण संस्था जम्मू-काश्मिरमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक असल्याचे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले आहे. त्याचप्रमाणे जम्मू काश्मिरच्या विकासाबाबत केंद्र शासनाकडून घेतल्या जाणा-या धोरणात्मक निर्णयाला एमआयटीचा पाठिंबा असेल.त्यानुसार जम्मू काश्मिरमध्ये एमआयटीतर्फे विविध अभ्यासक्रम सुरू केले जातील,असेही या पत्रात नमूद केले आहे.
सिंबायोसिसच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ.विद्या येरवडेकर म्हणाल्या,सिंबायोसिस जम्मू काश्मिरमध्ये शिक्षण संस्था सुरू करण्यास इच्छुक असून याबाबत निर्णय घेण्यासाठी सिंबायोसिसने काही माजी अधिका-यांची समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल आॅगस्ट महिनाअखेरपर्यंत प्राप्त होईल. त्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. मात्र,केंद्र शासनाने स्वत: पुढाकार घेवून केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील नामांकित संस्थांना जम्मू काश्मिरमध्ये शैक्षणिक संस्था सुरू करण्यासाठी बोलवावे. त्यामुळे अनेक चांगल्या संस्था या भागात सुरू होतील.शासनाच्या सहकायार्तून व लोकसहभागातून सिंबायोसिस जम्मू काश्मिरमध्ये शिक्षण संस्था सुरू करण्यास सिंबायोसिस तयार आहे.
------------
पुण्यातील काही शिक्षण संस्था जम्मू काश्मिरमध्ये शिक्षण संस्था स्थापन करण्यास इच्छुक असल्याचे वृत्त होते. परंतु,फर्ग्युसन कॉलेजसह आणखी काही शिक्षण संस्थांनी अद्याप यावर अंतिम निर्णय घेतला नसल्याचे समोर आले आहे.