पुणे : बीबीएच्या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर झालेल्या वादावादीमधून चौघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. आबासाहेब गरवारे वाणिज्य महाविद्यालयामध्ये शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. विद्यार्थ्यांनीच बाहेरील गुंडांच्या मदतीने शस्त्रांस्त्रांसह घातलेल्या राड्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यात चार विद्यार्थी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अनिरुद्ध भालेराव (वय २१), हर्षद चौगुले (वय २४), रोहन पेटकर (वय २४), शुभम गांगुर्डे (वय २१), सुमित बाटुंगे (वय २१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह शेखर वीर, शुभम सकट, अनिल तुपेरे, सुरज लोखंडे, अतुल जाधव, चिवड्या अशा २० ते २५ जणांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी दंगल आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. संकेत साळुंके (वय २०) याने फिर्याद दिली आहे. या घटनेत अक्षय दिनकर (वय २१) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळुंके आणि आरोपी गरवारे वाणिज्य महाविद्यालयामध्ये बीबीएच्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहेत. बीबीएच्या विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. साळुंके याचा गुरुवारी वाढदिवस होता. ग्रुपवर त्याला शुभेच्छा देत असताना आरोपी हर्षद चौगुले याने ग्रुपचे नाव बदलले. तेव्हा अक्षय दिनकर आणि हर्षद यांची ग्रुपवर वादावादी सुरु झाली. पेपर संपल्यानंतर अक्षय आणि साळुंके अन्य विद्यार्थ्यांसमवेत इमारतीच्या पार्किंगमध्ये आले. तेथे अनिरुद्ध भालेरावने अक्षयच्या कानाखाली मारली. सोबत आलेल्या गुंडांनीही त्याला मारहाण केली. मध्ये पडलेल्या साळुंके आणि अंकित झाडगे, विकास गिरे, मित्र समीर लाड यांना देखील जबर मारहाण करण्यात आली. आरोपींनी कोयत्यासारख्या हत्याराने तसेच टी आकाराच्या लोखंडी गजाने अक्षयच्या डोक्यात वार केले. तसेच सिमेंट ब्लॉकही डोक्यात घातले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरु झाला होता. त्याच्या मित्रांनी अक्षयला जवळच्या खासगी रुग्णालयात हलवले. (प्रतिनिधी)
व्हॉट्सअॅप वादातून पुण्यात मित्रावर हल्ला
By admin | Published: April 24, 2016 2:33 AM