अकोला : मित्राच्या बहिणीला बळजबरी घरामागे नेऊन, दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास आळशी प्लॉट परिसरात घडली. दोन्ही आरोपी फरार असून, खदान पोलिसांनी या प्रकरणी शनिवारी रात्री त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पीडित युवतीच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, तो आणि त्याची ३६ वर्षीय अविवाहित बहीण आळशी प्लॉट परिसरात राहतात. बहीण मानसिकदृष्ट्या आजारी असल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री १२च्या सुमारास अनुप ऊर्फ गुड्डू गणेश परिहार, चंद्रकांत किशोर निलाखे आणि पीडित युवतीचा भाऊ मद्यप्राशन करून आले. पीडितेच्या घराजवळ पोहोचल्यानंतर, तिघेही रस्त्यावरच गप्पा मारत बसले. नंतर भूक लागल्याचे निमित्त करून अनुप आणि चंद्रकांतने पीडितेच्या भावाला पोहे आणण्यासाठी बसस्थानकावर पाठविले. तो निघून गेल्याचे पाहून ते दोघेही घरात घुसले आणि मित्राच्या बहिणीचे तोंड दाबून तिला घराच्या पाठिमागे नेले. तेथे अनुप व चंद्रकांतने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिला रस्त्यावर सोडून दोघेही पसार झाले. पीडितेच्या भावाच्या तक्रारीवरून, खदान पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)
मित्राच्या बहिणीवर दोघांचा बलात्कार!
By admin | Published: January 03, 2016 2:36 AM