मुंबई : जगातल्या कोणत्याही राज्यात मुख्यमंत्री होणार नाही, असा मुख्यमंत्री आपल्याला लाभला आहे. आपण कोणतीही गोष्ट लपवून करत नाही. माझ्या मतदारसंघात हिंदू मतदारांची लोकसंख्या जास्त आहे, पण मला ते निवडून देतात. आपली शिवसेना ओरिजनल आहे आणि जुन्या शिवसेनेचा कोणताही वाण आला तर शिंदेच्या बाणापुढे टिकू शकणार नाही, अशा शब्दांत आमदार अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांकडून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे सरकारमधील आमदारांनी उपस्थिती लावली होती. यावेळी शिंदे सरकार स्थापन झाल्यावर आमच्या मतदारसंघाला निधी मिळाला. शिंदे यांनी रात्री दोन वाजता माझ्या नगपालिकेसाठी २० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना पेन चालवण्यामध्ये अडचणी होत्या, पण आता ती अडचण शिंदे यांनी सोडवली आहे. त्यांच्या उपकाराची परतफेड आम्ही करू शकत नाही, असे अब्दुल सत्तार म्हणाले.
ज्यांना अक्कल नाही तेही टीव्हीसमोर येऊन नक्कल करतात. एकनाथ शिंदे यांनी एक आदेश दिला असता तर हे लोक राज्यसभेतही पोहोचू शकले नसते, असा टोलाही अब्दुल सत्तार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला. आम्ही इमानदार राहिलो आणि शिवसेनेचे विधानपरिषद उमेदवार निवडून दिले. आम्ही दगाफटका केला नाही. पण शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला, तो बाळासाहेबांच्या राजकाराणातून आणि त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालवण्यासाठी घेतला, असे उद्गार अब्दुल सत्तार यांनी काढले.
याशिवाय, एकनाथ शिंदे हेच खरे शिवसेनेचे भविष्य आहेत. त्यांच्याच खांद्यावर शिवसेनेची जबाबदारी असेल. शिवसेनेचे धनुष्यही त्यांच्याच नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळेल. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच बाळासाहेबांचे विचार घेऊन शिवसेना पुढे जात आहे. आम्हाला लाभलेला जनसामान्यांना न्याय देणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे. कारण आत्तापर्यंत लेना बँका बघितल्या पण महाराष्ट्रातील देना बँक म्हणजे शिंदे साहेब, असे सांगत अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे.
याचबरोबर, अब्दुल सत्तार यांनी पुढे म्हटले की, मी 1980 पासून राजकारणात आहे. जिल्हाधिकाऱ्यापासून तहसीलदारापर्यंत आणि संसदेपासून ग्रामपंचायतपर्यंत मला सर्व नियम आणि कायदे माहिती आहेत. या सर्व अभ्यासाला स्मरुन सांगतो. एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी भारावूनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे, हे मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो असे अब्दुल सत्तार म्हणाले.