Aditya Thackeray News : अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने अटल सेतूवरून प्रवास करत पायाभूत सुविधांचा देशात वेगाने विकास होत असल्याचे सांगत केंद्र सरकारवर स्तुतीसुमने उधळली होती. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रतिक्रिया दिली. मात्र यावरून राजकारण देखील चांगलेच तापले असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे. रश्मिकाने सांगितलेल्या बाबींमधून काही गोष्टी राहिल्या असल्याचे ठाकरेंनी अभिनेत्रीचे नाव न घेता सांगितले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'च्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मी नुकतेच एका अभिनेत्रीला MTHL वर अचानक जाहिरात करताना पाहिले. त्यासाठी तिला पैसे दिले गेले की नाही याबाबत आश्चर्य वाटते. तिने केलेल्या जाहिरातीतील जागेला सध्याच्या राजवटीत अटल सेतू म्हणून ओळखले जाते, असा उपरोधिक टोला ठाकरेंनी लगावला. तसेच काही खऱ्या बाबी राहिल्या असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
- अटल सेतू- MTHL चे ८५% काम जून २०२२ पर्यंत पूर्ण झाले होते, जेव्हा आमचे सरकार पाडण्यात आले होते. हे काम महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले.
- भाजपच्या नेतृत्वाखालील खोके सरकारला उर्वरित १५% काम पूर्ण करण्यासाठी २.५ वर्षे लागली
- भाजपच्या नेतृत्वाखालील मिंधे राजवटीने MTHL चे उद्घाटन पूर्णतः तयार झाल्यानंतर ३ महिन्यांनी केले. कारण त्यांना VIP उद्घाटनाच्या तारखा मिळाल्या नव्हत्या म्हणून त्यांनी मुंबईची प्रगती रोखून धरली.
आदित्य ठाकरेंनी आणखी सांगितले की, जाहिरातीच्या अखेरीस ती (रश्मिका मंदाना) म्हणते, जागे व्हा आणि विकासाला मत द्या. जे चांगले आहे, कारण याचा अर्थ म्हणजे भाजपला मत देऊ नका. अशा जाहिराती करणाऱ्या सर्वांना एक नम्र विनंती आहे की, कृपया व्हिडीओचे चित्रीकरण करण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासा. काही पक्ष कलाकारांना 'युद्ध रुखवा दी' प्रकारच्या जाहिराती करायला लावत आहेत.