सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील अवैध बांधकामे, धोकादायक इमारती, दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था, २४ तास तैनात असलेली आपत्तकालीन टीम आदींचा आढावा आमदार कुमार आयलानी यांनी घेतला. यावेळी उपायुक्त प्रियंका राजपूत, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्यासह प्रभाग अधिकारी, शाखा अभियंता उपस्थित होते.
उल्हासनगरात धोकादायक इमारतीचे स्लॅब पडण्याचे सत्र शहरात सुरू असून गेल्या दोन महिन्यापूर्वी अश्या घटनेत १२ जणांचा बळी जाऊन असंख्य जण जखमी झाले. तर शेकडो जण बेघर झाले. दुर्घटनाग्रस्त इमारती मधील बेघर झालेल्या शेकडो नागरिकांना पर्यायी उपाययोजना, दुर्घटनाग्रस्त झालेल्या इमारतीच्या पुनर्बांधणी साठीचा आराखडा, भविष्यात अवैध बांधकामे दुर्घटनाग्रस्त होऊन जीवित व वित्तहानी होऊ नये, म्हणून महापालिकेने अवैध बांधकामावर केलेली कारवाई, आपत्कालीन टीम २४ तास तैनात ठेवणे. आदींचा आढावा घेण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी आमदार कार्यलयात मंगळवारी दुपारी आढावा बैठक घेऊन अधिकाऱयांचे म्हणणे ऐकून सूचना केल्या. यावेळी उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी महापालिका उपाययोजना व कारवाईची माहिती दिली. अवैध बांधकाम नियंत्रक व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी शहरातील अवैध बांधकामे व कारवाईची माहिती दिली.
शहरात लॉकडाऊन काळात शेकडो अवैध बांधकामे उभी राहिली असून आजमितीस असंख्य आरसीसी, टिगेटरचे अवैध बांधकामे सुरू आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अवैध बांधकामावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरलेले प्रभाग अधिकारी अजित गोवारी, अनिल खतूराणी, अजय एडके यांच्यासह संबंधित उपयुक्तांच्या बदलीची मागणी शहरातून होत आहे. आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी प्रभाग अधिकाऱ्यांच्या बदलीवेळी त्यांना अवैध बांधकामाला जबाबदार धरले होते. मात्र काही दिवसातच बदली केलेल्या अधिकाऱ्यावर पुन्हा प्रभाग अधिकारी पदी नियुक्त केल्याने, शहरातून आयुक्तवर टीका झाली. तसेच अवैध बांधकामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रभाग अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्याची मागणी होत आहे.
अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर
आमदार कुमार आयलानी यांच्या आढावा बैठकीनंतर अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला असून कल्याण महापालिकेच्या धर्तीवर अवैध बांधकामाची यादी महापालिकेने जाहीर करावी. तसेच त्यांचा पाणी व वीज पुरवठा खंडित करावा. अशी मागणी शहरातून होत असून अवैध बांधकामाला जबाबदार असणाऱ्या संबंधित प्रभाग अधिकाऱ्याची उचलबांगडी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.