शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सातत्याने वादग्रस्त विधान करून चर्चेत असणारे भिडे गुरूजी पुन्हा एकदा त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. कधी महिलांच्या टिकलीवरुन, तर कधी मूल जन्मावरुन, कधी कोरोनावरुन तर कधी भारतमातेवरुनही संभाजी भिंडेंनी वादग्रस्त विधान केले आहे. अशातच त्यांनी आता महात्मा गांधीबद्दल एक विधान केले ज्यावरून वाद चिघळला आहे. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत, असा दावाच भिंडेंनी अमरावती दौऱ्यात बोलताना केला.
संभाजी भिडेंच्या या विधानावरून आता राजकारण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यानी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. "पुज्य महात्मा गांधी यांच्याबाबत अकलेचे तारे तोडणाऱ्या नेहमीप्रमाणे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या या भिडे गुरुजीवर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी. सरकारने गांभीर्याने घ्यावे", अशा आशयाचे ट्विट मिटकरी यांनी केले आहे.
भिडे गुरूजी नेमकं काय म्हणाले?मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावेही उपलब्ध असल्याचा दावा संभाजी भिडेंनी केला आहे. दरम्यान, संभाजी भिडेंच्या या वादग्रस्त विधानाचे आज विधानसभेत पडसाद उमटले आहेत. विधानसभेत आमदार बाळासाहेब थोरात यांनी संभाजी भिडेंचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
बाळासाहेब थोरातांची टीका संभाजी भिडे यांच्या विधानावरून कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सडकून टीका केली. संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे वारंवार असं बोलतात, त्यांना पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी ते वारंवार अशी विधाने करतात? आम्ही सभागृहात संभाजी भिडेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने आजच या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही, असे थोरात यांनी सांगितले.