रोहित पवारांची संघर्ष यात्रा नव्हे तर बालमित्र घेऊन निघालेले मंडळ - अमोल मिटकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 10:24 AM2023-12-11T10:24:58+5:302023-12-11T10:25:29+5:30
संघर्ष यात्रेत सगळे बालकच आहेत. त्यांना आता अजितदादा व्हायचंय त्यामुळे बालमंडळाची फौज घेऊन ते चाललेत असा टोला मिटकरींनी लगावला.
नागपूर - वेगळे काहीतरी करायचे आणि त्यातून प्रसिद्धी मिळवायची या हेतूपलिकडे रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेत काही नाही.आयुष्यात ज्या व्यक्तिला कधी संघर्ष करण्याचं काम पडलं नाही. तुम्ही संघर्ष यात्रा म्हणू नका हे बालमित्र घेऊन निघालेले मंडळ आहे त्यामुळे लोकांच्या नजरेत या यात्रेला कवडीची किंमत नाही अशा शब्दात अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार रोहित पवारांवर टीका केली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, संघर्ष यात्रेत सगळे बालकच आहेत. त्यांना आता अजितदादा व्हायचंय त्यामुळे बालमंडळाची फौज घेऊन ते चाललेत. बालमित्र संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार आहेत.रोहित पवारांनी कुठला संघर्ष केलाय, कशासाठी यात्रा काढताय? रोहित पवारांच्या यात्रेत राष्ट्रवादीचे झेंडे नसतात असंही त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत रोहित पवारांना गांभीर्याने घेऊ नका. रोहित पवारांना एकीकडे अजितदादांचे भाजपासोबत जाणे पसंत नाही. परंतु अजितदादांनी दिलेला निधी चालतो. कर्जत जामखेड मतदारसंघासाठी अजितदादांनी ५४ कोटींचा निधी दिलाय त्यावर रोहित पवारांनी आभार मानलेत हे पत्रही मी ट्विट केले आहे. दादा सत्तेसोबत गेलेले रोहित पवारांना चालत नाही. मग त्यांनी दिलेला निधी कसा चालतो हे रोहित पवार आणि त्यांच्या बालमित्र मंडळाला विचारले पाहिजे असा टोला मिटकरींनी लगावला आहे.
दरम्यान, गोपीचंद पडळकरांवर झालेल्या चप्पल फेकीचे कुणीही समर्थन करू शकत नाही. धनगर समाजाच्या मागण्या आहेत ते धनगर समाजाचे नेते महादेव जानकर, गणेश हाके यासारखे अनेक नेते आहेत. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. त्यात पडळकरांवर झालेल्या घटनेचे कुणी समर्थन करणार नाही असं आमदार अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.
रोहित पवारांनी केली होती अजित पवारांवर टीका
प्रशासनावर पकड असलेले, कार्यक्षम, स्पष्टवक्ते, रोखठोक भूमिका घेणारे नेते म्हणून ओळख असलेले नेतृत्व आज स्वतःच्याच सहकाऱ्याची बाजू मांडताना अडखळत आहे, हे बघून अत्यंत वाईट वाटतं. भाजपला केवळ सांगकामे नेतृत्व आवडतं. स्वयंभू नेतृत्व त्यांना नको असतं म्हणूनच त्यांच्याकडून लोकनेते संपवले जातात. आता वैचारिक मतभेद असले तरी एक क्षमता असलेला लोकनेता भाजपच्या रणनीतीचा शिकार होत आहे, याचं दुःख सर्व सहकाऱ्यांसह सर्वसामान्यांनाही नक्कीच आहे" अशा शब्दात रोहित पवारांनी अजित पवारांच्या भूमिकेवर टीका केली होती.