आताच्या भाजप-शिवसेना (एकनाथ शिंदे गट) सरकारमधील अनेक नेते आणि शिंदे गटातील काही बंडखोर आमदार आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला होते. त्यांच्या या दाव्यांनंतर, आता राज्य सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांना चांगलाच टोमणा हाणला आहे.
मिटकरींना डॉक्टरांकडे नेऊन तपासावे लागेल, तेच आमच्या संपर्कात -मिटकरींना टोमणा लगावत सत्तार म्हणाले, मिटकरींना एकदा तपासावे लागेल, त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे नेले आणि तपासले, की निश्चितपणे त्यांच्यात काय फॉल्ट आहे, ते कळेल. राष्ट्रवादीतील अनेक लोक आमच्याकडे येतात. खरेतर तेच (अमोल मिटकरी) आमच्या संपर्कत आहेत, असे अब्दुलसत्तार यांनी म्हटले आहे. सत्तार आज अकोला दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा टोमणा लगावला आहे.
काय म्हणाले होते मिटकरी?मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री पद न मिळाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील गडचिरोली दौऱ्यावर असताना शिंदे गटातील अनेक आमदार त्यांच्या संपर्कात होते. एवढेच नाही, तर मंत्रिमंडळ विस्तार होत नाही आणि आम्हाला मंत्रिपद मिळेल, असे वाटत नाही. यामुळे आम्ही शिंदे-फडणवीस सरकारला सोडून येण्याच्या मनःस्थितीत आहोत, असे म्हणणारे जवळपास १२ आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आले आहेत. जयंत पाटील यांच्याकडे त्यांची नोंद आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले होते. विशेष म्हणजे, यासंदर्भात, जयंत पाटील यांना विचारले असता, आपल्याला याबाबत काही माहिती नाही, असे त्यांनी सांगितले आहे.