मुंबई - महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार सोमवारी पार पडला. मात्र या विस्तारानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षातील नाराजी चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यात आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके नाराज असल्याचे बोलले जात आहे.
मंत्रीमंडळ विस्तारनंतर प्रकाश सोळंके नाराज असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. आपण राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. प्रकाश सोळंके राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे पुत्र आहेत. राष्ट्रवादीला निवडणुकीपूर्वी भगदाड पडले असताना ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. मात्र त्यांना आता मंत्रीमंडळ विस्तारातून डावलण्यात आले आहे.
प्रकाशदादा चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. मागच्या आघाडी सरकारच्या काळात त्यांनी महसूल, भूकंप व पुनर्वसन, पणन, सहकार अशा महत्त्वांच्या खात्यांचे काम पाहिले आहे. बीडमधून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, बाळासाहेब आजबे, संदीप क्षीरसागर यांच्यासह प्रकाशदादा विधानसभेत दाखल झाले आहेत. यामध्ये प्रकाशदादांनी मंत्रीपद मिळेल अशी शक्यता होती. मात्र त्यांना डावलण्यात आले आहे.
राजकारणाची किळस आली आहे. त्यामुळे या राजकारणापासून बाजुला व्हायचं ठरवले आहे.त्यासाठी आमदारकीचा राजीनामा देणार असे प्रकाशदादा यांनी सांगितले.