आणखी एका आमदाराची साथ, शरद पवार गटातील अनेकजण संपर्कात, सुनील तटकरे यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 08:38 AM2023-10-11T08:38:55+5:302023-10-11T09:34:19+5:30
राज्यात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यव्यापी दौरा करणार आहेत
मुंबई – राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराने अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी अजित पवारांसोबत गेले असून त्यांच्यावर परभणी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शरद पवार गटातले अनेक जण अजित पवारांच्या संपर्कात आहेत. भविष्यात तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतील असा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
खासदार सुनील तटकरे म्हणाले की, अनेकजण अजित पवारांच्या संपर्कात आहेत. अनेकांशी चर्चा होत असते. त्याचसोबत भेटीगाठी होत असतात. भविष्यात तुम्हाला आणखी पाहायला मिळेल असं म्हणत तटकरेंनी शरद पवार गटावर टीका केली, महाराष्ट्राच्या राजकारणात एक पक्ष राजवट नाही. आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता आहे. २०१९ ला शिवसेनेशी युती करताना कोणत्या विचारधारेचा विचार केला होता याचे उत्तर द्यावे असंही त्यांनी म्हटलं.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांच्या हस्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. @SunilTatkare यांच्या मान्यतेने पक्षाच्या परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी श्री. अब्दुल्लाह खान अ. लतिफ खान दुर्राणी यांची नियुक्ती करण्यात आली. #ncpspeaksoffcialpic.twitter.com/Ep6p4ItzYG
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) October 10, 2023
अजित पवारांचा राज्यव्यापी दौरा
राज्यात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यव्यापी दौरा करणार आहेत. या दौऱ्याचा आणि निवडणूक आयोगातील सुनावणीचा दुरान्वये संबंध नाही. अजित पवारांच्या दौऱ्याचे नियोजन सुरू आहे. दसरा झाल्यानंतर राज्यभरात अजितदादांचे दौरे आणि सभा पाहायला मिळतील अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.
दरम्यान, गेले वर्षभर एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस काम करत होते, अजित पवारांसारखा प्रशासनाचा अनुभव असलेला नेता, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्या अनुभवामुळे सरकारला आणखी बळ मिळाले. राज्याचा कारभार आणखी गतिमान झाला. आमचा मंत्रिमंडळातला सहभाग झाला तेव्हा पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू होणार होते. वित्त आणि नियोजन खात्याचा कारभार सर्वाधिक अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होतो. हिवाळी अधिवेशनात आणखी अजितदादा लक्ष घालतील. ज्या मोकळीकीने दादा काम करताय, राज्याला गतिमान करण्यासाठी तिघेही प्रयत्नशील आहेत असं सुनील तटकरेंनी सांगितले.