Bacchu Kadu on ST Employees : एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरलं. तुम्हाला लाज वाटत नाही का अशा शब्दात बच्चू कडू यांनी सरकारला फटकारलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरुन विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारले होते. त्यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी यासाठीची समिती काम करत असून अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येतील असे म्हटलं. यावरुन आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांनी एसटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारावरुन सरकारला घेरलं.
विधानसभेत विरोधी पक्षाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात पाच हजार रुपयांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली. तसेच चांगल्या दर्जाच्या बस उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली होती. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी दर १० वर्षांनी शासकीय कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती केली जाते, असे सांगितले. तसेच २०२० आणि २०२४ साली वेतनकरार होऊ शकला नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर उच्चस्तरीय कमिटी नेमण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानुसार पुढे पावले उचलली जाणार आहेत, असे मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं.
त्यावर बोलताना दादा भुसेंनी दिलेली माहिती चुकीची असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी दिली. गेल्या चार पाच वर्षात एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत, असे वैभव नाईक यांनी म्हटलं. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. त्यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी सर्व कर्मचाऱ्यांचा पगार १० तारखेच्या आत केला जातो असं म्हटलं. त्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक होत एसटी महामंडळाच्या चालकाला जास्त पगार का मिळत नाही असा सवाल केला.
"दादा भुसेंनी फक्त सत्य सांगावं. अध्यक्ष महोदय तुमच्या किंवा दादा भुसेंच्या चालकाला जो पगार मिळतो, तो एसटी महामंडळाच्या चालकाला का मिळत नाही. तुमच्या गाडीचे चालक एसीमधून फिरतात. पण एसटीचा चालक भर उन्हाच एसटीत बसला की चौफेर घाम येतो. त्याचे कष्ट जास्त आहेत पण त्यांना पगार कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त अन्यायासाठी अफजलखान फाडला होता. तुम्ही अन्याय का करत आहात? किमान वेतन कायदा सांगतो की किमान १४ हजाराच्या वर वेतन दिलं पाहिजे. शासनच जर कायदा मोडत असेल, तर थोबाडीत कुणाच्या मारायची? काय सत्य आहे, काय असत्य आहे हे तुम्ही सांगा ना? तुम्हाला राग काय येत नाही का? याची लाज वाटली पाहिजे थोडी. एका चालकाला तुम्ही २५ ते ३० हजार पगार देता आणि जो सगळ्यांची सेवा करतो, त्याला तुम्ही १२ हजार पगार देता? याची तुम्हाला लाज वाटत नाही का?," असा सवाल बच्चू कडू यांनी केला.